मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सलग पाचव्यांदा विजय मिळवला असला तरी भाजपाला नागपुरात आणि विदर्भात अपेक्षित यश मिळू शकले नाही. २०१४ साली नागपुरातून भाजपाने ४४ जागा जिंकून घवघवीत यश मिळवले होते पण यावेळी फक्त २९ जागांवर समाधान मानावे लागले. फडणवीसांच्या मतदारसंघाजवळ असलेल्या दोन जागा काँग्रेसने जिंकल्या. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे.

उत्तर नागपूरमधून माजी मंत्री नितीन राऊत आणि नागपूर पश्चिममधून विकास ठाकरे यांनी विजय मिळवला. काँग्रेस-राष्ट्रवादीने १० तर अपक्षांनी पाच जागांवर यश मिळवले. स्वत: फडणवीस यांनी नागपूर दक्षिण पश्चिममधून मिळवलेला विजय तितकासा समाधानकारक नाही. मुख्यमंत्रीपदावर असल्यामुळे फडणवीस यांना एका लाखापेक्षा जास्त मताधिक्क्याने विजय मिळवू असा विश्वास होता. पण काँग्रेस उमेदवार आशिष देशमुख यांच्याविरोधात फडणवीसांनी ४९,४८२ मतांनी विजय मिळवला.

२००९ साली फडणवीस २७,७७५ मतांनी विजयी झाले होते. २०१४ साली त्यापेक्षा दुप्प्ट म्हणजे ५९,९४२ मतांनी विजयी झाले होते. पण यावेळी त्यांचे विजयाचे मताधिक्क्य १० हजारांनी घटले. मुख्यमंत्र्यांनी निवडलेली टीम अपेक्षेनुसार कामगिरी करु शकली असे राजकीय तज्ञांचे मत आहे.  भाजपाने सेव्ह मेरीट सेव्ह नेशनच्या सदस्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. एसएमएसएनचे सदस्य पक्षाचे प्रमुख मतदार आहेत. पण त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. अतिआत्मविश्वास असलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी तुम्ही राज्याच्या प्रचाराकडे लक्ष द्या, आम्ही मतदारसंघ सांभाळतो असे आश्वासन दिले होते. एकूणच या सगळयाचा फटका फडणवीसांना बसला. ३.८४ लाखापैकी १.९२ लाख लोकांनी मतदानाकडे पाठ फिरवली. त्यामुळे फडणवीस यांच्या मताधिक्क्यावर परिणाम झाला.

Story img Loader