Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत हाती आलेल्या कलानुसार महायुतीला जास्त जागा मिळण्याची अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, निवडणुकीचा निकाल आज सायंकाळपर्यंत स्पष्ट होईल. त्यामुळे महाराष्ट्रात काय होणार? कोणाचं सरकार येणार? महायुतीला किती जागा मिळणार? महाविकास आघाडीच्या किती जागा येणार? यासंदर्भातील चित्र आज स्पष्ट होईल.
दरम्यान, महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी १४५ जागांची गरज आहे. त्यामुळे हा आकडा महायुती पूर्ण करते की महाविकास आघाडी? हे महत्वाचं असणार आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात आतापर्यंत आलेल्या कलाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावर प्रतिक्रिया देत निकालाच्या आधीच मोठं विधान केलं आहे. “डंके की चोटवर मी तुम्हाला सांगतो की राज्यात महायुतीचं सरकार येईल”, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : “युगेंद्र पवार विजयी होतील, बारामतीकर..”; श्रीनिवास पवार यांचं वक्तव्य
रामदास आठवले काय म्हणाले?
“आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार महायुती आघाडीवर आहे. डंके की चोट वर मी तुम्हाला सांगतो की राज्यात महायुतीचं सरकार येईल. मागील काही निवडणुकीत मतदानाचा जेवढा टक्का होता. या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे. यामध्ये महिलांच्या मतदानाचा टक्का वाढला आहे. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचा मतदानाला मोठा उत्साह पाहायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं १० वर्षातील काम चांगलं आहे. त्यामुळे लोकांचा चांगला पाठिंबा मिळत आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला होता. त्यामुळे महाविकास आघाडीला असं वाटत होतं की ते सत्तेत येतील. मात्र, महाविकास आघाडीच्या स्वप्नांचा चक्काचूर होणार आहे”, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.