Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल आज २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला आहे. या या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचा मोठा विजय झाला. खरं तर ही विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी अटीतटीची होईल अशी चर्चा निवडणुकीआधी होती. मात्र, आज निकाल जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला तर महायुतीने मोठं यश संपादन केलं.
२३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत समोर आलेल्या कलानुसार महायुतीत भाजपाला १३७, शिवसेना (शिंदे) ५७, राष्ट्रवादी (अजित पवार) ४१ जागा आघाडीवर आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीला शिवसेना ठाकरे गटाला १६ जागांवर आघाडी आहे, तर राष्ट्रवादी (शरद पवार) १४ जागांची आघाडी आणि काँग्रेसला २० जागाची आघाडी असून या आकडेवारीत फारसा बदल होण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या पाच महिन्यांत राज्याचे चित्र पूर्णपणे बदलल्याचं या निवडणुकीत पाहायला मिळालं. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुतीने आघाडीला २८८ पैकी २०० पार जागा पार केल्या. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या यशाची चार कारणे कोणती? याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात.
हेही वाचा : पराभवानंतर अमित ठाकरेंची पहिली पोस्ट, “लढाई राजपुत्राची नसून..”
लाडकी बहीण योजना ठरली निर्णायक
लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला होता, तर महाविकास आघाडीला मोठं यश मिळवलं होतं. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत उलट चित्र पाहायला मिळालं. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीच्या सरकारने लाडकी बहीण योजना आणली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील दोन कोटींहून अधिक महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात. त्यामुळे या निवडणुकीत महिला मतदारांचा टक्का वाढला आणि या योजनेचा महायुतीला मोठा फायदा झाला. दुसरीकडे महाविकास आघाडीने त्यांचं सरकार आल्यास तीन हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, काँग्रेसशासित कर्नाटक आणि तेलंगणा सरकारचं उदाहरण देत काँग्रेसशासित राज्यात योजना राबवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत जोरदार प्रचार केला. त्यामुळे महायुतीसाठी लाडकी बहीण योजना निर्णायक ठरल्याचं बोललं जात आहे.
प्रचारात धर्म आणि जातीचा मुद्दा
विधानसभेच्या निवडणुकीत जाती आणि धर्माचे मुद्देही गाजले. यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा दिली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ए है तो सेफ है’ ही घोषणा दिली होती. त्यामुळे ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘ए है तो सेफ है’ अशा घोषणांनी राज्य ढवळून निघालं. दुसरीकडे महाविकास आघाडीने या विरोधात जशास तसं उत्तर दिल्याचं दिसलं नाही. या घोषणांमुळे शहरी आणि ग्रामीण भागात हिंदू मतदार जाती-पातीच्या पलीकडे महायुतीच्या मागे उभा राहिल्याचं या माध्यमातून दिसून येत आहे. तसेच महाविकास आघाडीच्या विरोधात प्रचार करताना विषेत: उद्धव ठाकरे यांच्या विरोधात महायुतीने ‘वोट जिहाद’चा आरोप केला होता. तसेच महाविकास आघाडी ‘वोट जिहाद’करत असेल तर आम्हाला ‘धर्मयुद्ध’ करावंच लागेल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ‘धर्मयुद्ध’ शब्दावरून चांगलंच ‘महाभारत’ रंगलं होतं. त्यामुळे या घोषणा निवडणुकीत महत्वाच्या ठरल्या आहेत.
मराठा आणि ओबीसी आरक्षण मुद्दा
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा जोरगार लावून धरला होता. त्यामुळे कुठेतरी मराठा मतदार महायुतीपासून बाजूला जाण्याची भिती व्यक्त केली जात होती. मात्र, तसं होऊ नये, याची काळजी महायुतीने विषेत: भारतीय जनता पक्षाने ओबीसी मतांची एकजूट कशी राहील? याची काळजी घेत निवडणुकीच्या काळात राज्यातील जवळपास सर्वच मतदारसंघात ओबीसी संघटनाच्या नेत्यांच्या बैठका घेत मतांचं ध्रुवीकरण होऊ नये याची पुरेपूर काळजी भाजपाने घेतल्याचं बोललं जातं. तसेच माधव हा पॅटर्न देखील या निवडणुकीत महत्वाचा ठरल्याचं बोललं जातं.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ फारसा एक्टीव्ह नव्हता अशी चर्चा होती. त्यातच भाजपाच्या एका मोठ्या नेत्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात विधान केलं होतं. त्याचीही चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती. मात्र, त्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये महत्वाची बैठक पार पडली. त्यानंतर या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील अॅक्टीव्ह दिसला. यामध्ये विशेषत: संघ परिवारातील सर्व संघटनांनी एकजुटीने ‘सजग रहो’ हे अभियान राबवलं. अधिकाधिक मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आलं. यात शहरांमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. लोकसभा निकालात धक्का बसल्यानंतर भाजपाने सूक्ष्म नियोजन केल्याचाही फायदा झाल्याचं पाहायला मिळत आहे.