Maharashtra Assembly Results Against BJP 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे अंतिम निकाल हाती आले असून विरोधकांचा मोठा पराभव झाला आहे. राज्यात महायुतीला तब्बल २३५ जागांवर विजय मिळाला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला अवघ्या ४९ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. एकट्या भाजपानं राज्यात १३२ जागांवर विजय मिळवत जवळपास एकहाती निवडणुका फिरवल्याचं निकालांवरून पाहायला मिळत आहे. या निवडणूक निकालांमुळे अनेक सत्तासमीकरणं उद्ध्वस्त झाली असून अनेक समीकरणांची नव्याने जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्यावरून आता राजकीय चर्चा सुरू झाली असताना दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या ऐतिहासिक विजयाबाबत विश्लेषण केलं जात आहे.
भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीत १४८ जागा लढवल्या. त्यापैकी तब्बल १३२ जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जिंकून आले आहेत. त्यामुळे राज्यात सत्तास्थापनेसाठीचा बहुमताचा १४५ चा जादुई आकडा गाठण्यासाठी भाजपाला अवघ्या १३ जागा कमी पडल्या. पण महायुतीनं जिंकलेल्या २३५ जागांपैकी एकट्या भाजपाच्या १३२ जागा असल्यामुळे सत्तास्थापनेच्या चर्चा आणि वाटपामध्ये भारतीय जनता पक्षाचा मोठा दावा असेल हे आता नक्की मानलं जात आहे. पण एकीकडे भारतीय जनता पक्षाचा विजयरथ चौखुर उधळलेला असताना पक्षाच्या १६ उमेदवारांना पराभूत करणाऱ्या उमेदवारांची चर्चा सुरू आहे. नेमक्या कोणत्या पक्षाच्या उमेदवारांनी भाजपाचा हा विजयरथ रोखला आहे?
कोण कुठे जिंकलं, कुठे पराभूत झालं…
k
१. अकोला पश्चिममध्ये भाजपाचे विजय कमलकिशोर अग्रवाल यांचा काँग्रेसचे साजिद खान यांनी पराभव केला.
२. उमरेडमझ्ये भाजपाचे सुधीर पारवे यांचा काँग्रेसचे संजय मेश्राम यांनी पराभव केला.
३. नागपूर पश्चिममध्ये भाजपाच्या सुधाकर कोहळेंचा काँग्रेसच्या विकास ठाकरेंनी पराभव केला.
४. नागपूर उत्तरमध्ये भाजपाच्या मिलिंद माने यांचा काँग्रेसच्या नितीन राऊत यांनी पराभव केला.
५. साकोलीमध्ये भाजपाच्या अविनाश ब्राह्मणकरांचा अवघ्या २०८ मतांनी पराभव करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जिंकून आले आहेत.
६. आरमोरीमध्ये भाजपाचे कृष्णा गजबे यांचा काँग्रेसचे रामदास मसराम यांनी पराभव केला.
७. ब्रह्मपुरीमधून भाजपाचे कृष्णलाल सहारे यांचा काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी पराभव केला.
८. वणी विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे संजीव बोडकुरवार यांचा ठाकरे गटाचे संजय देरकर यांनी पराभव केला.
९. यवतमाळमध्ये भाजपाचे मदन येरावार यांचा काँग्रेसचे अनिल मंगुळ यांनी पराभव केला.
१०. डहाणू मतदारसंघातून भाजपाचे विनोद मेढा यांचा माकपचे विनोद निकोले यांनी पराभव केला.
११. मालाड पश्चिममध्ये भाजपाचे विनोद शेलार यांचा काँग्रेसचे अस्लम शेख यांनी पराभव केला.
१२. वर्सोव्यात भाजपाच्या भारती लव्हेकर यांचा ठाकरे गटाचे हरून खान यांनी पराभव केला.
१३. भाजपाचे राम शिंदे यांचा कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे रोहित पवार यांनी पराभव केला आहे.
१४. भाजपाच्या अर्चना पाटील चाकूरकर यांचा काँग्रेसचे अमित देशमुख यांनी पराभव केला.
१५. भाजपाच्या राम सातपुतेंचा माळशिरसमधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उत्तमराव जानकर यांनी पराभव केला.
१६. पळुस-कडेगावमध्ये भाजपाचे संग्राम देशमुख यांचा काँग्रेसचे विश्वजीत कदम यांनी पराभव केला.
भाजपाच्या १६ पराभूत उमेदवारांची यादी
मतदारसंघ | भाजपा उमेदवार | विजयी उमेदवार |
अकोला पश्चिम | कमलकिशोर अग्रवाल | साजिद खान – काँग्रेस |
उमरेड | सुधीर पारवे | संजय मेश्राम – काँग्रेस |
नागपूर पश्चिम | सुधाकर कोहळे | विकास ठाकरे – काँग्रेस |
नागपूर उत्तर | मिलिंद माने | नितीन राऊत – काँग्रेस |
साकोली | अविनाश ब्राह्मणकर | नाना पटोले – काँग्रेस |
आरमोरी | कृष्णा गजबे | रामदास मसराम – काँग्रेस |
ब्रह्मपुरी | कृष्णलाल सहारे | विजय वडेट्टीवार – काँग्रेस |
वणी | संजय बोडकुरवार | संजय देरकर – ठाकरे गट |
यवतमाळ | मदन येरावार | अनिल मंगुळ – काँग्रेस |
डहाणू | विनोद मेढा | विनोद निकोले – माकप |
मालाड पश्चिम | विनोद शेलार | अस्लम शेख – काँग्रेस |
वर्सोवा | भारती लव्हेकर | हरून खान – ठाकरे गट |
कर्जत | राम शिंदे | रोहित पवार – शरद पवार गट |
लातूर शहर | अर्चना पाटील चाकूरकर | अमित देशमुख – काँग्रेस |
माळशिरस | राम सातपुते | उत्तमराव जानकर – शरद पवार गट |
पळुस कडेगाव | संग्राम देशमुख | विश्वजीत कदम – काँग्रेस |
विजयी व पराभूतांची यादी पाहिली असता भाजपाच्या पराभूत झालेल्या १६ उमेदवारांना हरवणाऱ्या पक्षांमध्ये ११ उमेदवार काँग्रेस पक्षाचे आहेत. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे दोन तर माकपच्या एका उमेदवाराचा समावेश आहे.