Highest And Lowest Margin in Maharashtra Vidhan sabha Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहे. भाजपाला १३० हून अधिक जागा मिळाल्या असून महायुतीत पुन्हा सत्तेत येण्यास सज्ज झाली आहे. काही मतदारसंघात मोठ्या मताधिक्क्याने उमेदवारांचा विजय झालाय, तर काही मतदारसंघात उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत होऊन अवघ्या दोन अंकी संख्येच्या फरकाने उमेदवार जिंकले आहेत. सर्वाधिक मताधिक्य असलेले आणि सर्वांत कमी मताधिक्य असलेल्या मतदारसंघाविषयी जाणून घेऊयात.
सर्वात जास्त मताधिक्य असलेले उमेदवार
भाजपाच्या काशिराम पावरा हे शिरपूर विधानसभा मतदारसंघात १ लाख ५९ हजार ४४ मतांनी विजयी ठरले आहेत. डॉ. जितेंद्र ठाकूर यांचा त्यांनी पराभव केला. काशिराम पावरा यांना १ लाख ७८ हजार ७३ मते मिळाली असून जितेंद्र ठाकूर यांना ३२ हजार १२९ मते मिळाली आहेत. बागलान मतदारसंघातून दिलीप बोरसे विजयी ठरले असून त्यांनी १ लाख २९ हजार २९७ मताधिक्यांनी विजय मिळवला आहे. तर बारामती विधानसभा मतदारसंघातही अजित पवारांनी १ लाखांच्या मार्जिनने विजय मिळवला आहे. बोरिवली विधानसभा मतदारसंघातून संजय उपाध्याय यांनी संजय भोसले यांच्यावर १ लाख २५७ मतांनी मात केली आहे.
उमेदवार | विधानसभा मतदारसंघ | पक्ष/युती/आघाडी | विरोधी पक्ष | मताधिक्य |
काशीराम वेचन पवार | शिरपूर | भाजपा | जितेंद्र ठाकूर (अपक्ष) | १४५९४४ मते |
शिवेंद्रराजे अभयसिंहराजे भोसले | सातारा | भाजपा | शिवसेना (उद्धव ठाकरे) | १४२१२४ मते |
धनंजय मुंडे | परळी | राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) | राजासाहेब देशमुख (एनसीपी शरद पवार) | १४०२२४ मते |
दिलीप बोरसे | बागलान | भाजपा | दीपिका चव्हाण (एनसीपी शरद पवार) | १२९२९७ मते |
आशुतोष काळे | कोपरगांव | राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) | संदीप वर्पे (एनसीपी शरद पवार) | १२४६२४ मते |
एकनाथ शिंदे | कोपरी-पाचपखाडी | शिवसेना (एकनाथ शिंदे) | शिवसेना (उद्धव ठाकरे) | १२०७१७ मते |
सर्वांत कमी मताधिक्य कोणाला?
तर, सर्वांत कमी मताधिक्य असलेला मतदारसंघ आहे मालेगाव मध्य. या मतदारसंघातून मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक यांचा विजय झाला असून त्यांना १ लाख ९ हजार ३३२ मते मिळाली आहेत. तर त्यांच्या विरोधातील आसिफ शेख राशिद यांना १ लाख ९ हजार २५७ मते मिळाली आहे. अवघ्या १६२ मतांच्या फरकाने आसिफ राशिद हरले आहेत. बेलापूर विधआनसभा मतदारसंघात मंदा म्हात्रे यांनीही संदीप नाईक यांच्याविरोधात अवघ्या ३७७ मतांनी मात केली आहे. तर बुलढाणा येथे संजय गायकवाड यांनीही जयश्री शेळके यांच्याविरोधात ८४१ मतांनी विजय मिळवला आहे.
उमेदवार | विधानसभा मतदारसंघ | पक्ष/युती/आघाडी | विरोधी पक्ष | मताधिक्य |
मालेगांव सेंट्रल | मुफ्ती मोहम्मद इस्माइल अब्दुल खलीक | एआईएमआईएम | आसिफ शेख रशीद (इस्लाम पार्टी) | १६२ मते |
साकोली | नाना पटोले | काँग्रेस | अविनाश अननराव ब्रह्मंकर (भाजपा) | २०८ मते |
बेलापुर | मंदा विजय म्हात्रे | भाजपा | संदीप गणेश नाइक (एनसीपी – शरद पवार) | ३७७ मते |
बुलढाणा | गायकवाड़ संजय रामभाऊ | शिवसेना (एकनाथ शिंदे गट) | जयश्री सुनील शेल्के (शिवसेना – ठाकरे गट) | ८४१ मते |
नवापुर | शिरीषकुमार सुरुपसिंग नाइक | काँग्रेस | शरद कृष्णराव गवित (अपक्ष) | १,१२१ मते |
बुलढाणा येथे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या संजय गायकवाज यांनी ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांचा अवघ्या ८४१ मतांच्या फरकाने पराभव केला. तर, राष्ट्रीवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या रोहित पवार यांनी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या राम शिंदे यांचा १,२४३ मतांच्या फरकाने पराभव केला.