सोलापूर : दहा वर्षांपूर्वी गोरगरीब जनतेची दिशाभूल करून, ‘अच्छे दिन आयेंगे’, ‘सबका साथ-सब का विकास’ अशी खोटी स्वप्ने दाखवून नरेंद्र मोदी सत्तेवर आले. परंतु त्यांच्या एवढा खोटा पंतप्रधान देशात झाला नाही आणि भविष्यात होणारही नाही. मोदींची सत्ता गेल्यानंतरच देशात खऱ्या अर्थाने ‘अच्छे दिन’ येतील, अशा शब्दांत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मोदी सरकार आणि भाजपवर हल्लाबोल केला.

पंढरपूर-मंगळवेढा आणि अक्कलकोट या दोन विधानसभा मतदारसंघांत काँग्रेसच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आले होते. मंगळवेढ्यात आयोजित सभेत त्यांनी भाजप आणि महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे आदींची उपस्थिती होती.

सिद्धरामय्या यांनी बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वर हे मंगळवेढ्यात १५ वर्षे राज दरबारात मंत्री म्हणून काम करीत होते. त्यांनी समाजातील उपेक्षित, वंचित, दीन-दलितांसह सर्व घटकांना एकत्र आणून मानवतेची शिकवण देण्यासाठी लिंगायत धर्माची स्थापना केली. त्यादृष्टीने मंगळवेढ्याचे महत्त्व खूप मोठे आहे, याचा उल्लेख केला. काँग्रेसने महात्मा बसवेश्वरांच्या सर्व समावेशक विचारांनीच काम केले आहे. महात्मा बसवेश्वरांना अभिप्रेत असलेली राज्यघटना काँग्रेसनेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून देशाला दिली. संविधानानुसार सर्व समाज घटकांना सोबत घेऊन विकास करणारा एकमेव काँग्रेस पक्ष असल्याचा दावा सिद्धरामय्या यांनी केला.

हेही वाचा – VIDEO : अमरावतीत नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा; माजी खासदारावर हल्ल्याचा प्रयत्न!

हेही वाचा – लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान

याउलट, भाजपला त्यांच्या अंगभूत गुणांप्रमाणे राज्यघटना मान्य नाही. केवळ उच्चवर्णीय आणि बड्या भांडवलदारांच्या हितासाठी भाजपने गेल्या दहा वर्षांत कारभार केला आहे. वेळोवेळी खोटी आश्वासने देऊन, जनतेची दिशाभूल करून, जातीधर्मात तेढ निर्माण करून सत्ता काबीज करणे हेच भाजपचे प्रमुख ध्येय राहिले आहे, असा आरोप सिद्धरामय्या यांनी केला.