सोलापूर : शहाजीबापू पाटील हा सरळसोट आणि अस्सल रांगडा माणूस आहे. त्यांनी सांगोल्यासह मुंबई ते थेट गोवाहाटीही जिंकली आहे. काय ती झाडी, काय तो डोंगार, काय ते हॉटिल, समदं ओक्के, अशा अस्सल ग्रामीण ढंगात केलेल्या संवादामुळे ते देश-विदेशात प्रसिद्ध झाले आहेत. खरे तर शहाजीबापू पाटील हे आमच्या टीमचे महेंद्र धोनी आहेत. त्यांना छप्परफाड मतांनी निवडून दिल्यास सांगोलेकरांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
सांगोला विधानसभा निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार, आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ सांगोल्यात आयोजित विराट सभेत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. या सभेतून मोठे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळाले.
राज्यातील बहिणी, भाऊ, शेतकरी, वारकरी हे सारेच माझे लाडके आहेत. शहाजीबापू पाटील हे माझे सर्वात लाडके आहेत. ते माझ्या टीमचे महेंद्र धोनी आहेत. विरोधकांकडून आलेल्या प्रत्येक चेंडूवर ते चौकार-षटकार ठोकतात. अरेला कारे म्हणण्याची ताकद त्यांच्यात आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी शहाजीबापू पाटील यांचा गुणगौरव केला.
ते म्हणाले, यापूर्वी सांगोल्याचे नेतृत्व अनेक वर्षे दुसऱ्याकडे होते. परंतु या दुष्काळी तालुक्यात वर्षानुवर्षे पाण्याचा प्रश्न कायम होता. शहाजीबापू पाटील यांनी महायुती सरकारकडून हजारो कोटींचा निधी खेचून आणून पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. त्यांची काय ती भाषा, काय तो डायलॉग, समदं ओक्के.. आजची प्रचंड सभा पाहून शहाजी बापूंच्या विजयाबद्दल एकदम ओक्के वाटते, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी आत्मविश्वास व्यक्त केला. त्यांनी संपूर्ण भाषणात विरोधकांवर कोणतेही भाष्य केले नाही.