Congress to Contest 100+ Seats: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे जागावाटपाची चर्चा असताना दुसरीकडे इच्छुक व नाराज उमेदवारांच्या मनधरणीचे प्रयत्न पक्षांकडून होत आहेत. बंडखोरी, अपक्ष उमेदवारी अशा गोष्टींमुळे ही निवडणुक यंदा दुरंगी किंवा तिरंगी न होता बहुरंगी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातल्या दोन्ही प्रमुख आघाड्यांमध्ये नेमक्या कुणाला किती जागा मिळणार? याची चर्चा चालू असताना मविआनं बुधवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन प्रत्येकी ८५ जागांचा निर्णय झाल्याचं स्पष्ट केलं. मात्र, गुरुवारी सकाळी विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस जास्त जागा लढवणार असल्याचं सांगितल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या निवडणुकीपर्यंत सेना-भाजपा युतीमध्ये मोठा भाऊ-लहान भाऊ कोण अशा चर्चा होत असत. आता महाविकास आघाडीच्या बाबतीतही तशी चर्चा होऊ लागली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला असून सर्वाधिक १३ खासदार पक्षाचे निवडून आले आहेत. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळणार असल्याची चर्चा होती. विजय वडेट्टीवार यांच्या भूमिकेमुळे या चर्चेला खतपाणी मिळाल्याचं बोललं जात आहे.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

मविआच्या पत्रकार परिषदेत २८८ जागांपैकी तिन्ही प्रमुख पक्ष प्रत्येकी ८५ जागा लढवणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यांची बेरीज २५५ होते. उरलेल्या ३३ जागांपैकी १८ जागा मविआनं मित्रपक्षांसाठी सोडल्या आहेत. पण त्याचवेळी शिल्लक १५ जागांबाबत स्पष्ट भूमिका मांडण्यात आली नव्हती. गुरुवारी सकाळी माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी या १५ जागांची तिन्ही पक्षांमध्ये अदलाबदली केली जाईल, अशी माहिती दिली. पण त्याचबरोबर त्यांनी १५ पैकी बहुतांश जागा काँग्रेसकडे येतील, असं विधान केल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

“काँग्रेसची पहिली यादी आज किंवा उद्या पहिली यादी येण्याची शक्यता आहे. ५४ उमेदवारांची ही यादी असेल. त्याला केंद्रीय निवड समितीची मान्यताही मिळाली आहे. उरलेल्या जागांसाठी उद्या बैठकीत चर्चा होईल. उद्या संध्याकाळी काँग्रेसच्या जवळपास ८५ टक्के जागा जाहीर होतील”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

मविआच्या फॉर्म्युल्यात १५ जागांचा हिशेबच नाही; या जागांचं नेमकं काय होणार? वडेट्टीवार म्हणतात…

“वरच्या १५ जागांची आम्ही आपापसांत अदलाबदली करणार आहोत. काँग्रेसचा एकूण जागांचा आकडा १०० ते १०५ च्या दरम्यान असेल. पण मुळात जागावाटप करताना कुणाला किती जागा असा विचार न करता मेरिटच्या आधारावर आम्ही जागावाटपाचा निर्णय घेतला आहे”, असं ते म्हणाले.

मुख्यमंत्रीपद कुणाला मिळणार?

दरम्यान, काँग्रेसला राज्यात सर्वाधिक जागा मिळाल्या, तर मुख्यमंत्री काँग्रेसचा होणार का? या प्रश्नावर वडेट्टीवार यांनी सूचक विधान केलं. “निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडी म्हणून एकत्र बसून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय महाविकास आघाडी घेईल. जास्त आमदार कुणाचे वगैरे यावर आम्ही आत्ता चर्चा करत नाही. महाविकास आघाडीचं बहुमत आणण्याचा आमचा विचार आहे”, असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhansabha election mva seat sharing formula vijay wadettiwar on congress pmw