ठाणे जिल्ह्यातील शहापूर विधानसभा मतदारसंघात 1995 चा अपवाद वगळता आतापर्यंत सत्तेच्या विरोधात असलेला आमदार निवडून येत असल्याची परंपरा यावेळीही महायुतीचे सरकार स्थापन झाल्यास कायम राहणार आहे. राज्यात महायुतीची सत्तेकडे वाटचाल सुरू असताना  शहापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे दौलत दरोडा यांनी राष्ट्रवादीमधून शिवसेनेत प्रवेश केलेले पांडुरंग बरोरा यांचा तब्बल 15 हजार 016 मतांनी पराभव केला आहे. विशेष म्हणजे बरोरा हे 2014 च्या मोदी लाटेतही राष्ट्रवादीकडून निवडून आले होते. पण, आता शिवसेनेकडून निवडणूक लढून देखील त्यांचा पराभव झाला. त्यामुळे दरोडांना राष्ट्रवादी पावली अशी चर्चा शहापूरमध्ये रंगलीये.

निवडणूक जाहीर होण्याआधी राष्ट्रवादीचे पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेत प्रवेश करून तिकीट तर मिळवले परंतू शहापूर तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह जनतेने त्यांना नाकारले असल्याचे या निकालानंतर स्पष्ट झाले आहे. तर शिवसेनेतून तिकीट मिळणार नाही असे दिसताच दौलत दरोडा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला व विजयश्री खेचून आणली. दौलत दरोडा यांना 75 हजार 804 इतके मतदान तर पांडुरंग बरोरा यांना 60 हजार 788 इतके मतदान झाले. दरोडा यांनी तब्बल 15 हजार 016 इतक्या मतांनी बरोरा यांचा पराभव केला.
मतदानाच्या 10 ते 12 फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर लागलीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशे, फटाके वाजवत गुलाल उधळून जल्लोष करायला सुरूवात केली.

या मतदारसंघात एकूण सात उमेदवारांपैकी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कृष्णा भवर यांनी तब्बल १० हजार ३५९ इतकी मते मिळवली तर नोटा ला चार हजार ३०८ इतक्या मतदारांनी पसंती दर्शविली.