तापमानाच्या विचित्र खेळाने सांगलीकर हैराण
पहाटे धुक्याची दुलई अन् दुपारी आग ओकणाऱ्या सूर्यामुळे ४२ अंशापर्यत गेलेले तापमान असा विचित्र अनुभव सांगलीकरांना बुधवारी आला. दिवसभर सूर्याच्या प्रखरतेने या वर्षांतील सर्वाधिक तापमान नोंदवित असतानाच वैशाख वणव्याच्या अनुभूतीमुळे सांगलीकर हैराण झाले. याचा परिणाम रस्त्यावरील वर्दळीवर झाला.
बुधवारी पहाटे पाच वाजल्यापासून कृष्णा काठालगतच्या गावामध्ये तपमान २० अंशापर्यंत खाली आले होते. सकाळी सात वाजल्यापासून सांगलीसह नदीकाठी असलेल्या गावामध्ये धुके पसरले होते. सकाळी आठ वाजेपर्यंत धुक्याची चादर पसरल्यामुळे नेमका पावसाचा हंगाम आहे की, उन्हाचा असा प्रश्न पडावा इतके धुके दाट होते. सांगलीनजीकच्या हरिपूर परिसरामध्ये तर सकाळी पिकावर आणि वाहनावर धुक्याचे पाणी झाल्याचे आढळून आले.
मात्र धुक्याची दुलई सकाळी आठ वाजता कमी होताच सूर्याची किरणे अधिक तीव्रतेने आग ओकत असल्याचे दिसून आले. दहा वाजल्यापासून तापमापकातील पारा क्रमाक्रमांने वाढत गेला. दुपारी डांबरी रस्ते आणि सिमेंटच्या इमारती तापल्याने तर हवेतील पारा सायंकाळी ४ वाजता ४२ वर गेला होता. या वर्षांतील हे सर्वाधिक तापमान नोंदले गेले.
गेल्या १० दिवसापासून शहरातील तापमान वाढत असले तरी बुधवारी त्याची तीव्रता सर्वाधिक असल्याचे हवामान नोंदणी कक्षातून सांगण्यात आले. वाऱ्याचा वेगही अत्यल्प म्हणजे ३ ते ५ किलामीटर प्रतितास होता. तर हवेतील आद्र्रता ११ टक्के होती.
या तीव्र उन्हाच्या तडाख्यामुळे दुपारपासून शहरात अघोषित संचारबंदीचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे. ग्राहकांनी पाठ फिरविल्याने आणि वर्दळ कमी झाल्याने काही दुकानदारांनी दुपारी विश्रांती घेण्याचा पर्याय स्वीकारला. शीतपेय विक्रेत्यांचा धंदा वाढला असून शीतपेय विक्री केंद्रावर लोकांची गर्दी वाढली असल्याचे चित्र शहरात दिसत आहे.