झारखंड हा आदिवासीबहुल भाग आहे. तेथील आदिवासींची घरे अतिशय स्वच्छ आहेत. शेणाने सारवलेल्या त्यांच्या घरात कचरा आढळत नाही, मात्र शौचालय बनविणे व त्याचा वापर करण्याबाबत आदिवासी उदासीन आहेत. गोंदिया जिल्ह्य़ातील चिचटोला ग्राम पंचायतीला पाहिल्यानंतर आता झारखंडमध्ये काम करण्यास प्रेरणा मिळाली असून महाराष्ट्र राज्य आता झारखंडसाठी ‘रोलमॉडेल’ ठरणार असल्याचे मत झारखंडच्या पाणी व स्वच्छता सहाय्य संस्थेचे संचालक डी. एन. प्रसाद यांनी व्यक्त केले.
जागतिक बँकेच्या सहकार्याने झारखंडच्या चमूने नुकतीच चिचटोला ग्राम पंचायतीला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी झारखंडच्या पाकूळ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष ग्यामलिन सोरेन, रांची जिल्हा परिषद अध्यक्षा सुंदरी तिर्की, जिल्हा परिषद सदस्य शिशिर लकडा, राज्य समन्वयक इशा सिंग, धनंजय भूनिया, जिल्हा समन्वयक डॉ. सरस्वती भाई, उमेशकुमार, कनिष्ठ अभियंता रविशंकर, शाहिद अली, दीपककुमार, यन्नेश सिंग आदी सदस्य उपस्थित होते.
पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन साबळे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी गावातील विविध उपक्रमांची तसेच स्वच्छतेची माहिती दिल्यानंतर गावफेरी काढण्यात आली. याप्रसंगी चमूने गावातील स्वच्छतेचे निरीक्षण करून गावात स्वच्छता राखल्याबद्दल ग्राम पंचायतीची प्रशंसा केली. गावकऱ्यांच्या वैयक्तिक शौचालयाची पाहणी करून त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. घरासमोर लावलेली परसबाग, शेतकऱ्यांनी लावलेल्या तटबुजाची वाडी, अनेकांच्या घरी असलेल्या बायोगॅसचीसुद्धा या वेळी पाहणी करण्यात आली.
चिचटोला येथील गावकरी जागृत असून त्यामुळेच गाव आताही निर्मल आहे. स्वच्छतेच्या बाबतीत जनजागृती करूनच स्वच्छता अबाधित राखता येऊ शकत असल्याचे मत देखील चमूतील सदस्यांनी गावाची पाहणी केल्यानंतर व्यक्त केले. चमूतील सदस्यांचे कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले. आपणसुद्धा आपल्या भागात वृक्ष देऊनच स्वागत करू, असा संकल्प देखील झारखंडच्या चमूने याप्रसंगी व्यक्त केला. भंडाऱ्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विस्तार अधिकारी वैशाली खोब्रागडे यांनी केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन साबळे यांच्या नेतृत्वाखाली विस्तार अधिकारी नेताजी धारगावे, ग्रामसेवक टी. आर. जनबंधू, सरपंच विमल वाळवे, माजी सरपंच अनिता बांबोळे, अनिरुद्ध बांबोळे, स्वच्छता समितीचे अध्यक्ष मुनेश्वर कापगते, उपसरंपच सीताराम गहाने, जि. प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भास्कर ठाकरे यांच्यासह निर्मल भारत अभियान कक्षातील तज्ज्ञांनी सहकार्य केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा