चंद्रपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यादंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत चंद्रपूरच्या जनता महाविद्यालयात शिक्षण घेतलेला सुबोध अशोक भैसारे (२६) याने राज्यात प्रथम क्रमांक, तर रेवती प्रशांत बागडे (२४) हिने मुलींमधून प्रथम, तर राज्यातून द्वितीय स्थान मिळवले आहे.
सुबोध भैसारे याचे मूळगाव गोंदिया जिल्ह्यातील सौंदड आहे. मागील वर्षी त्याचे वडील जिल्हा न्यायाधीश पदावरून निवृत झाले. त्याचे वडील चंद्रपूर सत्र न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम करत असताना सुबोधचे वास्तव्य चंद्रपुरात राहिले असून, जनता महाविद्यालय चंद्रपूर येथून तो १२ वी उत्तीर्ण झाला. वडिलांची अनेक ठिकाणी बदली झाली. त्यामुळे सुबोधला सोलापूर, नागपूर, वर्धा, बुलढाणा अशा जिल्ह्यांतील अनेक भागांत राहण्याचा योग आला. कायद्याचे शिक्षण पुण्यातील नामांकित आयएलएस विधी महाविद्यालयातून त्याने पूर्ण केले.
हेही वाचा – कॉंग्रेसच्या दोन माजी मंत्र्यांमुळे नाना पटोलेंची कोंडी
मुळातच अभ्यासूवृत्तीचा व प्रचंड मेहनती असलेल्या सुबोधला वडिलांचे मार्गदर्शन लाभले. आई कुंदा या गृहिणी असून, त्यांनी सुबोधचे अभ्यासापासून दुर्लक्ष होऊ दिले. तसेच त्याचा मोठा भाऊ हा देखील अभियांत्रिकी प्रशासकीय सेवेत उच्च पदावर रुजू असून, त्याची देखील प्रेरणा सुबोधला मिळाली. दुसऱ्या प्रयत्नात त्याने हे यश संपादित केले आहे.
रेवती बागडे हिने अत्यंत कमी वयात न्यायाधीश पदाला गवसणी घातली आहे. २०२१ साली आय. एल. एस. विधी महाविद्यालय येथून कायद्याचे शिक्षण पूर्ण करत अवघ्या एक वर्षात हे यश रेवतीच्या वाट्याला आले आहे. रेवती मूळ चाकण, पुणे येथील असून तिचे आई-वडील दोघेही सोनार व्यवसायात आहेत. तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण चाकण येथे झाले असून, १२ वी पुणे येथून झाले. तिने पहिल्याच प्रयत्नात हे यश संपादित केले आहे.
हेही वाचा – ज्येष्ठ नागरिकांना मदत हवी, मग ‘या’ हेल्पलाईनवर संपर्क साधा
—चौकट—
मी पहिल्या प्रयत्नात अपयशी झालो. त्यानंतर चुका शोधल्या. त्याच्यावर प्रयत्न केले. त्याचे फळ आज मिळाले. त्यामुळे, अपयश आले तरी खचू नका. प्रयत्न करत राहा, तुम्ही नक्कीच यशाला गवसणी घालणार, असे सल्ला सुबोध भैसारे याने दिला.
परीक्षेत मुलींचाच डंका
दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेमध्ये मुलींचाच डंका आहे. राज्यातील हजारो वकील या परीक्षेला सामोरे गेले होते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत अशा तीन टप्प्यांतून ही निवड प्रक्रिया राबवली गेली. मंगळवारी जाहीर झालेल्या निकालात मुली-मुलांपेक्षा सरस ठरल्या आहेत. निकालात ६३ जणांनी सुयश प्राप्त केले. त्यात ३८ महिला व २५ पुरुष न्यायाधीश झाले आहेत.