जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात शासनाकडून १५० कोटीहून अधिक रुपयांची कामे हाती घेण्याचा निर्णय झाला असून, राज्यातील सर्व दुष्काळी तालुके टँकरमुक्त करण्यात येतील. त्यासाठी लागेल तेवढय़ा निधीची तरतूद केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खटाव येथे ग्रामस्थांशी संवाद साधताना दिली.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाखणगाव येथे ग्रामस्थांनी मेहनतीने घडवलेल्या जलक्रांतीची पाहणी केली. ग्रामस्थांनी केलेल्या गावाच्या डोंगर उतारावर शेकडो हेक्टर समतल चर तसेच बांधलेल्या बंधाऱ्यांची छोटे ओढे- नाले रुंदीकरण व खोलीकरण आदी कामांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करून गावकऱ्यांच्या या कार्याची प्रशंसा केली.
फडणवीस म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियान हा शासनाचा पथदर्शी प्रकल्प असला तरी ती आता लोकचळवळ बनली आहे. हे जाखणगावने राबविलेल्या जलसंधारणाच्या कामावरून दिसून येते. जलसंधारणाची कामे मोठय़ा प्रमाणात राबवून गावेच्या गावे टंचाईमुक्त करण्यावर शासनाचा भर आहे. जलयुक्त शिवार ही जनतेची व प्रत्येक गावाची योजना झाली आहे. त्या माध्यमातून पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब अडवून पाणी टंचाईवर मात करण्यात येणार आहे. प्रत्येक गावामध्ये बागायती क्षेत्र वाढविण्यासाठी राज्य शासनाकडून आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. जलयुक्त शिवार अभियान हे शासनाचे क्रांतिकारक पाऊल आहे. त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी योगदान देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी जाखणगावमध्ये ग्रामस्थांनी मेहनत घेऊन लोकसहभागातून जलक्रांतीचे कौतुक केले. हा जाखणगाव पॅटर्न जिल्हाभर राबविण्यासाठी आता, टप्प्याटप्प्याने कामे हाती घेतली जातील असे ते म्हणाले.
खटावचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर म्हणाले की, खटाव तालुक्यातील डार्क वॉटर शेडखाली ५४ गावांना प्राधान्य देण्याची गरज होती. मात्र, त्यातील काही मोजकीच गावे जलयुक्त शिवार अभियानात घेतली आहेत. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. तेव्हा फडणवीस यांनी संबंधितांना माहिती घेऊन अहवाल देण्याच्या सूचना केल्या. यावेळी रणजितसिंह देशमुख यांनीही दुष्काळी भागातील पाणी योजना पूर्ण करण्याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले.
पालकमंत्री विजय शिवतारे, दीपक पवार, महेश शिंदे, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, डॉ. अविनाश पोळ, रवींद्र पवार यांची यावेळी उपस्थिती होती.
‘जलयुक्त शिवार’मधून महाराष्ट्र टँकरमुक्त करू – फडवणीस
जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात शासनाकडून १५० कोटीहून अधिक रुपयांची कामे हाती घेण्याचा निर्णय झाला असून, राज्यातील सर्व दुष्काळी तालुके टँकरमुक्त करण्यात येतील. त्यासाठी लागेल तेवढय़ा निधीची तरतूद केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खटाव येथे ग्रामस्थांशी संवाद साधताना दिली.
First published on: 26-05-2015 at 04:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra will tanker free from jalyukt shivar fadnavis