जळगाव येथे आयोजित ५८ व्या राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्राने १४ वर्षांआतील गटात दुहेरी मुकूट मिळविला. महाराष्ट्राच्या सॉफ्टबॉलच्या इतिहासात असा विक्रम पहिल्यांदाच घडला आहे. याशिवाय मध्यप्रदेशातील इंदूर येथे झालेल्या १७ वर्षांआतील गटात महाराष्ट्राच्या मुलींनी उपविजेतेपद मिळविले तर, मुलांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
सॉफ्टबॉलमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासात सलग दोन वर्षे शालेय राष्ट्रीय स्पर्धेमध्ये एवढे घवघवीत यश याआधी कधीच मिळाले नव्हते. महाराष्ट्राकडून १४ वर्षांआतील गटात नाशिकच्या रचना विद्यालयाची अर्पिता देशपांडे हिने सर्वच सामन्यांमध्ये आपल्या खेळाचे उत्कृष्ठ प्रदर्शन केले. १७ वर्षे वयोगटात भाऊसाहेबनगरच्या गिताई वाघ कन्या विद्यालयातील कल्याणी मोगलनेही चांगली कामगिरी केली. जळगावच्या स्पर्धेला अती उत्कृष्ट श्रेणीची स्पर्धा म्हणून जाहीर करण्यात आले आहे. आ. गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य संघटनेचे सचिव डॉ. प्रदीप तळवेलकर यांचे प्रभावी नियोजन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या सहकार्यामुळे यशस्वी झाली. यशस्वी खेळाडूंना पदक व चषक देऊन गौरविण्यात आले.

Story img Loader