हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पहायला मिळाली. माजी मुख्यमंत्री आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष निवडणूक संदर्भातील नियम समितीचा अंतरिम अहवाल सभागृहात मांडला. विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी मतदानानं होणार असून यावर विरोधी पक्षाने आक्षेप घेतला. दरम्यान नाना पटोले यांनी यावेळी बोलताना वापरलेल्या एका शब्दावरुन भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार चांगलेच संतापले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फडणवीसांनी नोंदवला आक्षेप

“ज्या सरकारकडे १७० चे बहुमत सांगितले जाते, त्या सरकारच्या मनात अध्यक्ष निवडणुकीसाठी स्वत:च्या बहुमातावर विश्वास का नाही?,” अशी विचारणा यावेळी फडणवीसांनी केली. नियम बदलले तर किमान त्याचा सभागृहासमोरील विचाराचा कालावधी कमी करता येणार नाही असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

विधानसभेच्या स्थापनेपासून असलेली प्रथा बदलण्याचा अट्टाहास का? इतके असुरक्षित सरकार…; फडणवीस सभागृहात संतापले

“महाराष्ट्राच्या इतिहासात इतके असुरक्षित सरकार मी पाहिले नाही. स्वतःच्या आमदारांवरच अविश्वास असणारे सरकार आम्ही महाराष्ट्राच्या इतिहासात कधी पाहिले नाही. महाराष्ट्र विधानसभेच्या स्थापनेपासून जी प्रथा होती, ती बदलण्याचा अट्टाहास का? तुम्ही हे रेटून नेणार असाल तर आम्ही आमची लढाई कायदेशीर लढू,” असा इशारा यावेळी फडणवीसांनी दिला.

नाना पटोलेंच्या घोडेबाजार शब्दावरुन आक्षेप

“पक्षांतर्गत जी घटनादुरुस्ती झाली त्याप्रमाणे घोडेबाजार बंद व्हावा हा त्यामागचा हेतू होता,” असं नाना पटोले यांनी यावेळी सांगितलं. यावेळी विरोधकांनी घोडेबाजार शब्दावर आक्षेप घेतला. यानंतर नाना पटोले यांनी घोडेबाजार म्हटल्यावर यांना एवढा त्रास का अशी विचारणा केली.

“जी काही संवैधानिक दुरुस्ती झाली, त्याप्रमाणेच आपल्या विधीमंडळाचंही कामकाज व्हावं अशी अपेक्षा आहे. नियम काही पहिल्यांदा बदलत नाही आहोत. हा जो नियम बदलला जात आहे त्यावरही विरोधकांचा आक्षेप आहे. पण हे नियमाप्रमाणे होत असून आमची या प्रस्तावाला मान्यता आहे,” असं नाना पटोले यांनी सांगितलं.

हा काय घोड्यांचा तबेला आहे का?, सुधीर मुनगंटीवार संतापले

यावर भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बोलताना नियम न बदलता एकमतही करता येतं असा सल्ला दिला. “सरकारने मनात कोणताही दुजाभाव किंवा आम्ही मोठे आहोत ही भावना न ठेवता विरोधी पक्षासोबत एकत्र येऊन अध्यक्ष निवडता आला असता,” असं यावेळी ते म्हणाले. दरम्यान यावेळी त्यांनी हे सरकार बेईमानी करुन सत्तेवर आलं आहे असा उल्लेख करताना सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेतला.

त्यानंतर पुढे बोलताना ते म्हणाले की, “ठीक आहे बेईमानी शब्द मागे घेतो, कारण हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. प्रदेशाध्यक्षांनी (नाना पटोले) सर्व आमदारांचा घोडेबाजार असं म्हणून अपमान केला. हा काय घोड्यांचा तबेला आहे का? हे आमदार विकाऊ आहेत का?”.

यावर नाना पटोले यांनी आक्षेप नोंदवत या लोकांनी अंधाऱात सरकारं तयार केली, मग त्याला काय म्हणायचं? अशी विचारणा केली. यावर मुनगंटीवार यांनी सदस्यांनी सहनशीलता वाढवली पाहिजे असं सांगत आम्ही मरुन जाऊ पण असा घोडेबाजार होऊ देणार नाही म्हटलं. तसंच नानाभाऊ दहा वर्षे भाजपामध्ये राहिलात एवढे संस्कार केले त्याचा उपयोग तर करा, तो जरा तरी टिकवा असाही टोला लगावला.

गुप्त मतदान घ्यावं अशी मागणी करताना सुधीर मुगगंटीवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रस्ताव मांडल्याबद्दल नाराजी जाहीर केली. “साहेब तुमच्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे. तुम्ही व्हा विभीषण आणि प्रस्ताव मागे घ्या. घाबरता कशाला,” असं ते म्हणाले. प्रस्ताव पुढे रेटायचाच असेल तर मतदान घेऊन रेटा असंही ते म्हणाले.

नवाब मलिकांनी करुन दिली वाजपेयींची आठवण

नवाब मलिक यांनी यावेळी क्रॉस वोटिंग होऊ नये म्हणून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी असा निर्णय घेतला होता. किमान त्यांच्या निर्णयाचा तर आदर करा. मग सर्वांनी आता हरकत घेऊ नका आणि एकमताने मंजूर करा असं आवाहन केलं.

अटलजींच्या नावाचा चुकीचा वापर करू नका – फडणवीस

यावर देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीला श्रद्धेय अटलजी यांनी कधीही व्हीप लागू केला नाही. त्यामुळे त्यांच्या नावाचा चुकीचा वापर करू नका. तुमच्या भीतीसाठी कशाला खोटे बोलता? अशी विचारणा केली.