राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी सर्व आमदारांना सुरक्षित प्रवासाला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला आहे. आज विधानसभेमध्ये राजकीय टीका करताना अपघात हा शब्द अजित पवारांनी वापरला. त्यावरुनच त्यांना भारतीय जनता पार्टीचे आमदार जयकुमार गोरे यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाल्याचं आठवलं आणि त्यांनी याच मुद्द्यावरुन सर्वांना रात्री १२ ते ३ प्रवास करु नका असा सल्ला दिला. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडेंना आपण असाच सल्ला दिल्याचंही अजित पवार म्हणाले.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीमध्ये जाऊन पवार कुटुंबियांना आव्हान दिल्याचा मुद्दा उपस्थित करत अजित पवारांनी बानकुळेंना चांगलेच सुनावले. “अलीकडे सप्टेंबर महिन्यात आपलं सरकार आल्यावर आपल्यानंतरचे नेते हे बारामतीमध्ये आले आणि सांगितलं बारामतीमध्ये घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार. ते अशाप्रकारच्या वल्गना करतात,” असं म्हणत थेट उल्लेख न करताना पवारांनी चंद्रशेखर बानकुळेंना टोला लगावला. “आता आमचं तिथं काम आहे खरंच तिथं करेक्ट कार्यक्रम होणार आहे का?” असा प्रश्न अजित पवारांनी विचारला.

“जर मी मानावर घेतलं तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करेन. मी महाराष्ट्राला ठाऊक आहे. जर एखाद्याला चॅलेंज दिलं ना मी कुणाचंही ऐकत नाही. कुणाच्या बापाचंही ऐकत नाही हे पण खरं आहे. गाडी फारच फास्ट चाललीय. फास्ट गाडीचा कधीही अपघात होऊ शकतो,” असं अजित पवार म्हणाले. तसेच पुढे अपघात या शब्दावरुन गोरेंच्या अपघाताचा संदर्भ देत सर्व आमदारांना सुरक्षित प्रवासाचा सल्ला अजित पवारांनी दिला.

“अपघातावरुन आठवलं मधल्या काळात आपण विनायक मेटेंना गमावलं. परवा पण जयकुमार गोरेंनी इथं भाषण केलं आणि रातोरात काय झालं. बाबांनो रात्री १२ ते ३ प्रवास नका करु,” असं अजित पवार म्हणाले. त्यानंतर सभागृहामध्ये आपल्या मागील रांगेमध्ये बसलेल्या धनंजय मुंडेकडे हात करुन अजित पवारांनी, “हा धनंजयही त्या दिवशी चालला होता. त्याला म्हटलं शहाणपणा करा, रात्री १२ ते ३ प्रवास करु नका. काय त्या दोन तीन तासांनी होणार आहे?” असा प्रश्न विचारला.

“आपण कितीही बसलो तरी त्या चालकाला कधी डुलकी लागेल कळत पण नाही. मी म्हणतो की सर्वांना जीव महत्त्वाचा आहे. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे चांगले, सुरक्षित रस्ते होत आहेत, महामार्ग चांगले होत आहेत. नियमांचं पालन केलं पाहिजे. काही बंधन स्वत:वर घालून घेतली पाहिजेत,” असं अजित पवार म्हणाले.

Story img Loader