यवतमाळमधील मारेगाव तालुक्यात एका महिलेने दोन लहान मुलांसह विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ग्रामस्थांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी विहिरीतून विवाहितेच्या तीन वर्षांच्या मुलीला सुखरुप बाहेर काढले. मात्र, विवाहितेचा आणि तिच्या सहा वर्षांच्या मुलाचा या घटनेत मृत्यू झाला.
मारेगाव पासून ११ किलोमीटर अंतरावर असलेल्या सगणापूर येथे रुपा विनोद जुनगरी (वय ३१) या राहतात. रुपा यांनी मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास मुलगा लक्ष (वय ६ वर्ष) व मुलगी आरोही (वय ३ वर्ष) यांच्यासह स्वत:च्या शेतातील विहिरीत उडी मारली. हा प्रकार बाजूच्या शेतात काम करत असलेले अजाबराव आत्राम यांना लक्षात आला. त्यांनी तातडीने विहिरीकडे धाव घेतली. त्यांनी आजुबाजुच्या लोकांना गोळा करून तिघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र यात फक्त त्यांना मुलीचे प्राण वाचवता आले. तर रुपा आणि त्यांचा मुलगा लक्ष यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. रुपा यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.