Rupali Chakankar order inquiry against Atul Awtade: अकलूजमध्ये दोन जुळ्या बहिणींनी एकाच तरुणाशी लग्न केल्याच्या प्रकरणाची दखल थेट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली आहे. या प्रकरणासंदर्भात रुपाली चाकरण कर यांनी थेट सोलापूरच्या पोलीस अधिकक्षकांना टॅग करुन प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे जुळ्या बहिणींशी विवाह करणाऱ्या अतुल अवताडेंविरोधात अकलूजमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या दुसऱ्याच दिवशी थेट राज्य महिला आयोगाने या प्रकरणात लक्ष घातल्याने अतुलच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
नेमकं घडलं काय?
२ डिसेंबर रोजी अकलूमध्ये एकाच तरूणाला वरमाला घालून दोन बहिणी विवाहबध्द झाल्या. या दोन्ही जुळ्या बहिणी मूळ मुंबईत कांदिवलीत राहणाऱ्या आहेत. दोघीही आयटी इंजिनियर असून दोघीही मुंबईतच अंधेरीमध्ये एकाच आयटी कंपनीत नोकरी करतात. या दोघींनी मूळच्या अकलूजच्या अतुल नावाच्या तरूणाबरोबर एकत्रित विवाह केला. या विवाहसोहळ्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.
…म्हणून दोघींनी त्याच्याशी केला विवाह
रिंकी आणि पिंकी या दोन्ही जुळ्या बहिणी आपल्या वडिलांच्या पश्चात विधवा आईसह एकत्र राहायच्या. एकेदिवशी आईसह दोन्ही जुळ्या बहिणी आजारी पडल्या. त्यांना अतुल याने रूग्णालयात दाखल केले होते. टॕक्सी वाहतुकीचा व्यवसाय करणाऱ्या अतुल याने दोन्ही रिंकी आणि पिंकीसह त्यांच्या आईला आजारपणात केलेली मदत मोलाची होती. घरात पुरूष नसल्यामुळे अतुल आधार बनला होता. दरम्यान, दोन्ही जुळ्या बहिणींपैकी एकीचा अतुलवर जीव जडला. ही बाब दुसऱ्या बहिणीच्या लक्षात आली. दोघीही एकमेकींशिवाय जगूच शकत नव्हत्या. एकीने अतुलशी विवाह केल्यास दुसरीचे जगणे मुश्किलीचे ठरणार होते. म्हणून दोघींनीही अतुल याच्याशी एकत्रित विवाह करण्याचा निर्णय घेतला. आईनेही दोन्ही जुळ्या मुलींच्या भावना आणि अतुलची सेवाभावी वृत्तीही विचारात घेऊन त्याच्या एकट्याशीच दोन्ही जुळ्या मुलींना विवाह करण्यास संमती दिली.
नक्की पाहा >> फडणवीसांनी चालवलेल्या आलिशान Mercedes-Benz कारची किंमत पाहून व्हाल थक्क! ९ गेअर, ९ एअरबॅग, BJP कनेक्शन अन्…
महिला आयोगाने घेतली दखल
मात्र या लग्नाची अकलूजपासून सोशल मीडियावरही चर्चा असतानाच आता रुपाली चाकणकर यांनी या लग्नाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. “सोलापूर येथील एका तरुणाने मुंबईतील जुळ्या बहिणींशी एकाच मांडवात लग्न केले आहे. या लग्नाची सोशल मीडियातून सर्वत्र चर्चा सुरू आहे. तसेच माध्यमातून या लग्नाच्या बातम्या सुरु आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम ४९४ प्रमाणे हा गुन्हा आहे. तरी सोलापुर पोलिस अधिक्षकांना आपण उपरोक्त बाबत चौकशी करून त्वरीत कायदेशीर कारवाई करावी. तसेच केलेल्या कारवाई बाबतचा अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम १९९३ चे कलम १२ (१) व १२ (२) अन्वये तात्काळ सादर करावा,” असे निर्देश चाकणकर यांनी दिले आहेत. यासंदर्भात त्यांनी दोन ट्वीट केले आहेत.
नक्की वाचा >> “टिकली ही महिलेच्या कर्तृत्वाचं…”; संभाजी भिडेंना राज्य महिला आयोगाची नोटीस; नोटीशीत म्हणाले, “त्यांनी केलेल्या वक्तव्याचा…”
दरम्यान, यापूर्वीच अतुलविरोधात भारतीय दंडविधानाच्या कलम ४९४ अन्वये अकलूज पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अकलूजचे पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशमुख यांनी दिली आहे.
लग्न अकलूजमध्ये का?
अतुलचे बहुतांशी नातेवाईक अकलूज परिसरात राहतात. त्यामुळे त्याचा हा अनोखा विवाह सोहळा अकलूजमधील गलांडे हाॕटेलमध्ये पार पडला. ठरल्यानुसार झालेल्या या विवाह सोहळ्यात अतुलच्या रूपाने एकाच वराला रिंकी आणि पिंकी या दोन्ही जुळ्या बहिणींनी वरमाला घातली. या लग्नाचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता अतुल आणि त्याचे नातेवाईक अडचणीत आल्याचं चित्र दिसत आहे.