ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना महाराष्ट्र रियल इस्टेट रेग्युलेटरी (महारेरा) बोर्डाने दणका दिला आहे. फ्लॅटधारकांशी केलेल्या करारानुसार वेळेत पैसे देऊनही घराचा ताबा न दिल्याबद्दल महारेराने हा दणका दिला आहे. फ्लॅटधारकाला सदनिका घेतल्यापासून 10.65 टक्के व्याजाने पैसे परत करण्याचा आदेश दिला असून या दाव्याच्या खर्चापोटी 20 हजार रुपये भरपाई द्यावी, असे आदेशात म्हटले आहे.

माहितीनुसार, मुंबई येथे राहणारे शब्बीर शामशी आणि त्यांची पत्नी यांनी डी एस के यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. शामशी यांनी डीएसके यांच्या डीएसके ड्रीम सिटी वॉटर फॉल रेसिडेन्सीमध्ये फ्लॅट बुक केला होता. त्यासाठी त्यांनी 1 कोटी 8 लाख रुपयांचा करारही केला होता. ठरल्याप्रमाणे त्यांनी त्याचे पैसेही डीएसके यांना दिले होते. याशिवाय 5 लाख 99 हजार रुपयांचे मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क देखील भरले होते. त्यानंतरही त्यांना फ्लॅट न मिळाल्याने व यापुढेही तो मिळण्याची शक्यता दिसत नसल्याने त्यांनी अ‍ॅड़ सुदीप केंजळकर यांच्यामार्फत महारेराकडे दावा दाखल केला होता. त्यानंतर महारेराच्या समितीने दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर संबंधित बांधकाम व्यावसायिकाने 10.65 टक्के दराने व्याजासह रक्कम ग्राहकाला परत करावी असा आदेश दिला. तसेच संबंधित बांधकाम व्यावसायिकाने दाव्याच्या खर्चापोटी 20 हजार रुपयांची रक्कम ग्राहकाला द्यावी. ही रक्कम 30 दिवसांत ग्राहकाला द्यावी असा आदेश न्यायालयाने दिला.

डीएसके यांच्याविरोधात थेट पैसे परत करण्याचा हा पहिलाच निर्णय आहे. डिएसके यांच्या विरोधात ठेवीदारांची फसवणुक केल्याबद्दल पुणे, मुंबई, कोल्हापूर येथे गुन्हे दाखल आहेत. त्यात स्वत: डीएसके, त्यांची पत्नी व मुलगा हे तिघेही सध्या न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात आहेत.