गारपिटीमुळे जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचा धसका घेऊन काही शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला. जिल्हा प्रशासनाने तातडीने आवश्यक पावले उचलली. या प्रयत्नांना सक्रिय साथ देण्यासाठी सामाजिक व शिक्षण संस्थाही पुढे आल्या आहेत. पुण्यातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलींच्या निवासासह संपूर्ण शिक्षणाचा भार उचलण्याचे ठरविले आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून ही भावना कळविली. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी या सामाजिक संवेदनशीलतेबद्दल संस्थेचे कौतुक केले.
शेतकरी कुटुंबात कर्ता पुरुष गेल्यामुळे कुटुंबाची परवड होते. ती थांबविण्यासाठी संस्थेने मदतीची तयारी दर्शविली. अशा शेतकरी कुटुंबातील मुलींचा संस्थेच्या पुणे येथील कर्वेनगर शैक्षणिक संकुलात निवास-भोजनासह संपूर्ण शिक्षणाचा खर्च केला जाणार आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलींसाठी जिल्हाधिकारी कार्यालय अथवा महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कर्वेनगर, पुणे ४११०५२ येथे संपर्क साधण्याचे आवाहन आहे. याशिवाय संस्थेचे सचिव रवींद्र देशपांडे (९४२२०३४७६४, ९७३०६५५२६४) किंवा ०२०-५३१३१००/२०० या क्रमांकावर संपर्क साधावा.
गरजवंत कुटुंबांना मदतीची गरज लक्षात घेऊन थेट आर्थिक मदतीपेक्षा या कुटुंबातील मुलींना स्वावलंबी बनवून स्वत:च्या पायावर उभे राहण्याच्या दृष्टीने त्यांच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी उचलण्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ठरविले आहे. भारतरत्न महर्षी कर्वे यांनी स्त्री शिक्षणासाठी ११७ वर्षांपूर्वी ही संस्था स्थापन केली. संस्थेत सध्या ३ हजारांहून अधिक मुली शिक्षण घेत आहेत. जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी जे. टी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनीही संस्थेचे या पुढाकाराबद्दल आभार मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharshi karve stree shikshan sanstha help to suicide affected farmers girls
Show comments