Maharashtra Cabinet Expansion Updates : राज्यात महायुती सरकारच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शिपथविधी झाल्यानंतर आता दहा दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे निश्चित झाले आहे. आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नागपूरमध्ये राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. नव्या मंत्र्यांच्या शपथविधीपूर्वी सध्या सर्वत्र महायुतीतील पक्ष कोणा-कोणाला संधी देणार याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहेत. दुसरीकडे सत्ताधारी पक्षांतील अनेक आमदार मंत्रिपदासाठी प्रयत्न करत आहेत. अशात भाजपाचे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना भाजपाकडून संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. यावर एएनआय या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना आमदार शिवेंद्रराजे यांनी त्यांना अजूनपर्यंत मंत्रिपदासाठी फोन आला नसल्याचे म्हटले आहे.
काय म्हणाले आमदार शिवेंद्रराजे भोसले?
नागपूर येथे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी दाखल झालेले भाजपाचे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार का? शपथविधीसाठी फोन आला होता का? असे विचारण्यात आले होते. याला उत्तर देताना आमदार शिवेंद्रराजे म्हणाले, “आतापर्यंत फोन तर आलेला नाही. कार्यकर्ते आणि मतदारसंघातील लोकांना मंत्रिपदाची आशा आहे. पण, पक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो काही निर्णय घेतील तो मान्य असेल.”
कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे?
आज नागपूर विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार असला तरी, महायुतीतील किती मंत्र्यांचा शपथविधी होणार, कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रशासनाकडून नागपूरच्या राजभवनमध्ये शपथविधीची तयारी करण्यात आली आहे. आज दुपारी ४ वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडेल, अशी माहिती राजभवनाच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी भाजपाचे आमदार गिरीश महाजन यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी निरोप आल्याचे सांगितले आहे. यावेळी त्यांनी गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
शिवेंद्रराजे सलग पाचव्यांदा विधानसभेत
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत आमदार शिवेंद्रराजे सलग पाचव्यांदा विधानसभेत पोहचले आहेत. यावेळी त्यांनी सातारा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उमेदवार अमित कदम यांच्यावर १,४२,१२४ मतांनी विजय मिळवला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेले शिवेंद्रराजे मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्या जवळचे असल्याचे मानले जाते. त्यामुळे यावेळी त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.