तसे अजून १२ वाजले नव्हते. बीबी का मकबऱ्याच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्याच्या शेवटच्या टोकावर इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सच्या परिसरात एक गाडी उभी राहिली. अर्धवट गुडघा झाकता येईल एवढाच पंचा खाली आणि तसेच खादीचे उपरणे घातलेला एक माणूस उतरला. डोळ्यावरचा चष्मा, हातात काठी असे पाहून या विभागातले सारे चकित झाले. प्रत्येकाला वाटले, गांधीच अवतरले! ज्यांना अमेरिकेमध्ये दुसरा गांधी म्हणून ओळखले जाते, ते बर्गी मायर गांधी प्रचारासाठी औरंगाबाद येथे आले होते.
मायक्रोबायॉलॉजी या विभागात त्यांचे व्याख्यान झाले. निमित्त होते आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनाचे. गांधींच्या वेशात गांधी समजवून सांगणाऱ्या या व्यक्तीबरोबर आणखी एक भारदस्त व्यक्तिमत्त्व होते, त्यांचे नाव लॅरी क्रिसेन. व्हिएतनाम युद्धात जंगलांमध्ये दोन वर्षे लढल्यानंतर युद्धातला फोलपणा लक्षात घेऊन हे व्यक्तिमत्त्वही गांधी विचारांच्या प्रभावाखाली आले. या उभयतांनी गांधी तत्त्वज्ञानातील सत्य आणि अहिंसेचे तत्त्वज्ञान यावर भाष्य केले.
‘देव’ म्हणजे सत्य, असे गांधी म्हणत. त्यांच्यामध्ये बदल होत गेला आणि ते म्हणू लागले, ‘सत्य’ म्हणजे देव! नैतिकता, मानवता आणि अहिंसा या तीन मूल्यांचा उलगडा कसा होत जातो, या दोन्ही गांधीवादी विचारवंतांनी समजावून सांगितले. गांधी म्हणत, ‘माझं जगणं हा एक संदेश आहे. सत्याची ताकद त्यात तुम्हाला दिसेल. प्रेमाने सत्याचे दरवाजे उघडता येतात. सत्य जे आतमध्ये घ्यायचे, अनुभवायचे आणि बेडरपणे मांडायचे,’ अशी गांधीतत्त्वज्ञानाची मांडणी बर्गी मायर यांनी केली. त्यांचा आणि गांधी तत्त्वज्ञानाच्या संबंधाविषयी बोलताना ते म्हणाले, ‘तसा मी कॅथोलिक. येशू ख्रिस्तांचे विचार अनुसरणारा.
मात्र, हे विचार अधिक कृतीत आणायचे असतील, तर गांधी आवश्यक आहे.’ ७६ वर्षांचे बर्गी मायर यांना गांधींचा विचार एका आंदोलनातून कळला. अमानवीय संघर्षांसाठी डाऊ कंपनी वेगवेगळी रासायनिक हत्यारे तयार करण्याच्या कामाला लागली होती. त्या विरोधात बर्गी मायर यांनी आंदोलन केले. १९५९ मध्ये या आंदोलनानंतर त्यांना अटक करण्यात आली. तीन महिने तुरुंगवास झाला. ते बाहेर आले आणि त्यांच्यावर तीन वर्षे सरकारची नजर होती. या काळात त्यांना अहिंसेचे तत्त्वज्ञान कळले. ‘सत्या’ चा उलगडा झाला. हळूहळू गांधीवाद हीच समस्यांवरची उपाययोजना असल्याचे लक्षात आले आणि या कामासाठी जगभर प्रचार करण्याचे ठरले. गांधींचा संदेश देणे हे काम हाती घेतल्याचे बर्गी आवर्जून सांगतात. गांधी वेशातल्या या माणसाची गांधी तत्त्वज्ञानाकडे बघण्याची दृष्टी कशी या अनुषंगाने मायक्रोबायॉलॉजी विभागातील प्राध्यापकांनी त्यांच्याशी चर्चा केली.
गांधीवादावर बोलणारे दुसरे व्यक्तिमत्त्व होते लॅरी क्रिसेन. इराक, दक्षिण कोरिया, अफगाणिस्तान आणि व्हिएतनाम या धगधगत्या देशांना भेटी दिल्यानंतर कमी खर्चाचे पाणी शुद्धीकरणाचे यंत्र बनविणारे लॅरी हेदेखील गांधींचे अभ्यासक. व्हिएतनामच्या युद्धात दोन वर्षे जंगलात राहिल्यानंतर जगभरातले युद्ध थांबायला हवे, यासाठी अमेरिकेतील सैन्यांनी केलेल्या विश्व शांती संघटनेचे काम करणारा कार्यकर्ता. ते म्हणाले, गांधी तत्त्वज्ञानाकडे कसे आकर्षित झालो, हे सांगता येत नाही. खूप वर्ष योगाभ्यास केला. विपश्यना केली.
युद्धाच्या वेळी बहुतेकदा पाण्याच्या साठय़ांवर हल्ले केले जातात. पाणी दूषित होते आणि त्या भागात रोगराई पसरते. त्यामुळे पाणी शुद्धीकरणाचे यंत्र कमी खर्चाचे असावे, असे वाटले. त्यातूनच गांधी तत्त्वज्ञानाकडे खेचलो गेल्याचे लॅरी आवर्जून नमूद करतात.
एका बाजूला अंगावर पंचा घेऊन खणखणीत आवाजात गांधी तत्त्वज्ञान समजावून सांगणारे बर्गी मायर आणि दुसऱ्या बाजूला धिप्पाट लॅरी क्रिसेन यांच्याकडूनही गांधी तत्त्वज्ञान ऐकण्याचा अनुभव निश्चितपणे प्रेरक असल्याची प्रतिक्रिया श्रोत्यांनी व्यक्त केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा