थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यात ऑटोरिक्षा चालवून कशीबशी गुजराण करणाऱ्या दोघा वारसांना अखेर शासकीय सेवेत सामावून घेण्याचा आदेश जारी झाला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवारांच्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय घेणाऱ्या शासनाने सावित्रीबाईंनी पुण्यातील ज्या भिडे वाडय़ात पहिली शाळा सुरू केली, त्या वाडय़ाच्या नूतनीकरणासाठी ८ कोटींचा निधी देण्याचेसुद्धा मान्य केले आहे.
 महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे शिक्षणाचा प्रसार व समाज सुधारणेचे कार्य नव्याने सांगण्याची काही गरज नाही. सुधारणावादी कार्यातून संपूर्ण देशाला प्रेरणा देणाऱ्या फुले कुटुंबातील ११ वारस सध्या हयात आहेत. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या या वारसांना शासनाने मदत करावी, अशी मागणी गेल्या तीन दशकांपासून अनेकांकडून केली जात होती. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव तसेच प्रसिद्ध विचारवंत हरी नारके यांनीही शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. शासन याकडे गांभीर्याने बघत नाही हे बघून वारसांपैकी महात्मा फुल्यांची पणतू सून असलेल्या नीता रमाकांत होले यांनी २०११ मध्ये नागपूरच्या हिवाळी अधिवेशन काळात उपोषण केले होते. या उपोषणाची दखल घेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी दोन वर्षांपासून हा प्रश्न शासनदरबारी लावून धरला होता.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुनगंटीवार तसेच या वारसांसोबत मुंबईत बैठक घेतली. त्यात होले कुटुंबातील दोघांना नोकरी देण्याचा निर्णय झाला. या निर्णयाची अंमलबजावणी मात्र होत नव्हती. अखेर मुख्यमंत्र्यांच्या निर्देशावरून पुण्यातील समाजकल्याण आयुक्तालयाने कुणाल होले व विशाल होले या दोघांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे आदेश २ मार्चला जारी केले आहेत. या दोघांनाही पुण्यातील समाजकल्याण कार्यालयात नोकरी देण्यात आली आहे. आजवर ऑटोरिक्षा चालवून व पत्र्याच्या घरात राहून कशीबशी गुजराण करणाऱ्या फुल्यांच्या दोन वारसांना नोकरीमुळे बराच दिलासा मिळाला आहे. सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडे वाडय़ात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती. या वाडय़ाची अवस्था अतिशय वाईट आहे. हा वाडा स्मारक म्हणून विकसित करावा, अशी मागणी मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे लावून धरली होती. त्यालाही मान्यता मिळाली असून या वाडय़ाच्या नूतनीकरणासाठी व स्मारक निर्मितीसाठी ८ कोटींचा निधी देण्याचे शासनाने तत्त्वत: मान्य केले आहे.
फुलेंचे नाव घेऊन राजकारण करणारे अनेक जण आहेत, मात्र त्यांच्या वारसाकडे लक्ष देणे गरजेचे होते, असे मत मुनगंटीवार यांनी आज ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा