महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नात कर्नाटक शासन जाणीवपूर्वक गोंधळ घालत आहे, असा आरोप कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, आमदार सतेज पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांनी सीमा भागात कन्नडिंग्यांकडून सुरू असलेल्या कारवाया विरोधात कोल्हापुरात शनिवारी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
हेही वाचा- दिल्ली महापालिकेत विजय; ‘आप’कार्यकर्त्यांचा कोल्हापुरात जल्लोष
सीमाभागात कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घालायला सुरुवात केली आहे. याच्या विरोधात महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी सतेज पाटील, हसन मुश्रीफ या आमदारांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, कोल्हापूर कायम सीमावाशीयांच्या पाठीशी राहिला आहे. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने लढा दिला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकी मध्ये भाजपला सत्ता गमवावी लागणार असल्याचा अंदाज आला आहे. त्यामुळे सीमाभागा बद्दल काहीही बोलून लोकांची नजर दुसरीकडे नेण्याचा डाव आहे, असा आरोप त्यांनी केला.
हेही वाचा- ‘विशाळगडावरील अतिक्रमण महाशिवरात्रीपूर्वी हटणार’; छत्रपती संभाजीराजे यांचे विधान
सीमावासीय आंदोलनात
सीमावासियांवरील अन्यायाच्या निषेधार्थ शनिवारी कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक स्थळी महाविकास आघाडीच्यावतीने धरणे आंदोलन केले जाणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती, छत्रपती संभाजी राजे यांनाही निमंत्रित केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘तो’ तपशील मिळावा
कोल्हापुरात प्रथमच महाराष्ट्र – कर्नाटक राज्यातील राज्यपालांची बैठक झाली. या बैठकीत सीमा प्रश्न, तेथील गावे, अडचणी याबाबत कोणती चर्चा झाली. तसेच या बैठकीबाबत महाराष्ट्र शासनाने कोणती भूमिका मांडली हेही लोकांसमोर आले पाहिजे, असेही यावेळी सतेज पाटील म्हणाले.