महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतल्या नेत्यांवर वेगवेगळे आरोप करत आहेत. ठाकरे सरकार मला तुरुंगात डांबण्याच्या प्रयत्नात होतं असा दावा त्यांनी अलिकडेच केला होता. यावर देवेंद्र फडणवीस यांना टीव्ही ९ मराठीच्या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी फडणवीस म्हणाले की महाविकास आघाडी सरकार मला जेलमध्यं टाकू शकलं नसतं, मला जेलमध्ये टाकू शकतील एवढी त्यांची ताकद नाही, हिंमतही नाही आणि मला जेलमध्ये टाकू शकतील असे मी काही केलेही नाही.
फडणवीस म्हणाले की, मला जेलमध्ये टाकण्यासाठी त्यांनी जंग-जंग पछाडलं, कादगपत्र तयार करण्याचा प्रयत्न केला, खोटी कागदपत्रं तयार करण्याचा प्रयत्न केला. मी मागच्या सरकारच्या काळातही सांगितलं की मला जेलमध्ये टाकण्याची सुपारी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना देण्यात आली होती. पण मी ५ वर्ष गृहमंत्री होतो त्यामुळे माझे गृहखात्यात चांगले सबंध आहेत.
फडणवीस म्हणाले की, मी गृहमंत्री असताना कधीही पैसे घेऊन पोलिसांच्या नियुक्त्या केल्या नाहीत. मी मेरीटवर लोकांच्या नियुक्त्या केल्या. ज्यांना कधीही अशी अपेक्षा नव्हती की आपल्याला मोठी पदं मिळू शकतात, त्यांनादेखील मोठी पदं मिळाली. मी कधी कोणालाही अपमानित केलं नाही. त्यामुळे एक प्रकारचं प्रेम पोलीस विभागामधील मोठ्या अधिकाऱ्यांमध्ये माझ्याबद्दल होतं आणि त्यामुळे ते (महाविकास आघाडी) जे प्रयत्न करायचे ते सगळे प्रयत्न मला समजायचे किंबहुना त्यांच्या प्रयत्नांमध्ये फार कोणी त्यांना मदतदेखील करत नव्हतं, कारण अधिकाऱ्यांनाही माहिती होतं की अशा प्रकारचं वागणं योग्य नाही.
हे ही वाचा >> शिवसेनेतील फूट प्रकरण : सत्तासंघर्षांत आज महत्त्वाचा निकाल, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
“खोट्या केसेस तयार करण्याचा प्रयत्न”
उपमुख्यमंत्री म्हणाले की, इतर राज्यांच्या तुलनेत आपल्या राज्यातलं पोलीस प्रशासन चांगलं आहे. त्यामुळे आधीचं सरकार मला तुरुंगात टाकू शकलं नाही. मी स्पष्टपणे सांगतो की, या लोकांनी (महाविकास आघाडी) पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. खोट्या केसेस तयार करण्याचा प्रयत्न केला. अडचणीत असलेल्या अधिकाऱ्यांना सांगितलं की, तुम्ही मागच्या सरकारचं या प्रकरणात नाव घ्या, एका केसमध्ये खोटी कागदपत्र तयार करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना तसं करता आलं नाही.