टीईटी परीक्षेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी राज्य परीक्षा आयोगाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसानी अटक केलेली आहे. त्यांच्याकडे पहिल्या धाडीत ८८ लाखांची रक्कम आणि काही दागिने सापडले होते. त्यानंतर आता दुसर्‍या धाडीत त्याच्याकडे जवळपास दोन कोटी रुपये आणि काही दागिने आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे या सर्व घोटळ्यांची सीबीआय चौकशी व्हायला हवी, अशी मागणी केलेली आहे. तर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केला आहे.

पेपरफुटी प्रकरण : तुकाराम सुपेंकडे आणखी घबाड सापडलं ; दोन कोटी रुपये आणि दागिन्यांचा समावेश

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, “एकीकडे परीक्षांमध्ये घोळ करायचा आणि दुसरीकडे कोट्यवधींची संपत्ती जमा करायची ! तुकाराम सुपे यांच्यावर मविआ सरकारचा वरदहस्त असल्याशिवाय तरी हे शक्य होणार नाही. लाखो मुलांच्या आयुष्यासोबत खेळताना, त्यांच्या भविष्याचं वाटोळं करताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही.”

तसेच, “परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थी आत्महत्या करत आहेत आणि हे लोकं लुटारू सत्ताधाऱ्यांसोबत मिळून आपले खिसे भरत सुटले आहेत. अधिकाऱ्यांना हाताशी धरून मविआ सरकार अनेक विभागात पैसे खात सुटलं आहे. यांना भस्म्या झाला आहे का ? या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी व्हायलाच हवी.” अशी देखील चंद्रकांत पाटील यांनी मागणी केली आहे.

याचबरोबर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील या संदर्भात ट्वीट करत प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. शिवाय, या सर्व घोटाळ्यांची सीबीआय चौकशी व्हावी अशी देखील त्यांनी मागणी केलेली आहे.

“सीबीआय चौकशी झाली तरच या घोटाळ्यांमधील मंत्रालयातील धागेदोरे उघड होतील, अन्यथा…”

“या सर्व घोटाळ्यातील गुंतागुंत पाहता सीबीआय चौकशी व्हायलाच हवी. सीबीआय चौकशी झाली तरच या घोटाळ्यांमधील मंत्रालयातील धागेदोरे उघड होतील, अन्यथा वसुलीचे हे आणखी एक प्रकरण कधी उजेडात येणारच नाही. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, लाखो विद्यार्थ्यांना वेठीस धरणार्‍या खर्‍या गुन्हेगारांचा शोध घ्यायचा असेल, तर हे प्रकरण सीबीआयला सोपवा.” असं फडणवीस ट्विट्द्वारे म्हणालेले आहेत.

Story img Loader