विधानसभेत महायुतीच्या आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडतो आहे. दरम्यान आदित्य ठाकरे, नाना पटोले, जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार आदी विरोधी पक्षातील आमदारांनी शपथ न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामागचं कारणही विरोधकांनी सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आमदारकीची शपथ आम्ही निषेध म्हणून घेतलेली नाही. जल्लोष, उत्साहाचं वातावरण असतं. त्यामुळे मनात हाच प्रश्न पडतो की जनतेने दिलेला कौल आहे की नवडणूक आयोगने दिलेला कौल आहे? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला आहे. एवढ्या बहुमताने सरकार निवडून आलं आहे. पण कुठलाही जल्लोष नाही. मध्यंतरीच्या काळात काँग्रेस किंवा आम्ही सगळे असू आम्ही निवडणूक आयोगाकडे आमचे प्रश्न उपस्थित केले आहेत. ते प्रश्न जनतेच्या मनातले प्रश्न आहेत. आम्ही राजकीय पक्ष म्हणून उपस्थित करतो तसंच मार्कडवाडी नावाचं गाव आहे तिथेही जनतेने मॉकपॉल मागितला होता. जनतेच्या मनातल्या शंका आहेत त्यासाठी हे तिथल्या लोकांनी मागितलं होतं. बॅलेट पेपरवर किती जागा कोण जिंकतं आणि त्याविरोधात ईव्हीएमवर कोण कसं जिंकतं हे आम्ही दाखवून दिलं आहे. मात्र त्या गावात कर्फ्यू लावण्यात आला. २० जणांना अटक करण्यात आली. आम्ही हरलेले नाहीत. तरीही आमच्या मनात ईव्हीएमबाबत शंका आहे. आम्ही जनतेचा मान राखून शपथ घेणार नाही. लोकशाहीचा मोर्चा आम्ही हाती घेत आहोत त्याची सुरुवात होते आहे. २०१४ पासून लोकशाही मारण्याचं काम सुरु आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

“विधानसभेचे निकाल लागले आणि अनेक ठिकाणी अनेकांच्या मनात खदखद सुरु झाली. या निकालांवर महाराष्ट्राचा विश्वास कसा बसेल हा प्रश्न आहेच. मार्कडवाडीने भूमिका घेतली ती बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची. बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायची असताना निवडणूक आयोग मधे आला. मला माझ्या गावात निवडणूक घ्यायची असेल तर पोलिसांचा काय संबंध? तुम्ही हे घ्यायचंच नाही असं का? गावातल्या लोकांच्या निर्णयावर वरवंटा फिरवण्याचं काम लोकशाहीने निवडून आलेले लोक करत असतील तर हे लोकशाहीने निवडूनच आलेले नाहीत. पाच वाजताचं मतदानाचं प्रमाण वेगळं, त्यानंतरचं वेगळं असं कसं होऊ शकतं? १ ची बेरीच पाचवेळा केल्यावर ते पाच होतात सहा कसे आले? निवडणूक आयोगाने जो प्लान आखला होता त्यावर बोलावंच लागेल.” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

नाना पटोले काय म्हणाले?

महाराष्ट्रातल्या जनतेच्या ज्या जनभावना आहेत ते पाहून आम्ही शपथ घ्यायची नाही हा निर्णय आम्ही घेतला आहे. महाराष्ट्रातलं सरकार जनतेतलं नाही. जनतेतलं सरकार असतं तर आझाद मैदानावर जनतेचे कोट्यवधी रुपये खर्च केले नसते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरु आहेत आणि सरकार शपथविधीसोहळा हा राज्याभिषेकासारखा होत असेल तर आम्ही जनतेच्या बाजूच मांडणार आहे. आम्ही शपथ न घेण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आम्ही उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधींशी चर्चा करुन यापुढचा निर्णय घेऊ असं नाना पटोले म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahavikas aghadi mlas will not take oath today nana patole and aditya thackeray told this reason scj