नागपूर शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले, अमरावती विभागात धिरज लिंगाडे, औरंगाबदमध्ये विक्रम काळे, नाशिकमध्ये शुभांगी पाटील आणि कोकणात बाळाराम पाटील असे पाच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तसेच, पाचही जागा आम्ही जिंकू, असा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केला आहे.
मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना नाना पटोले म्हणाले की, “केंद्र सरकारच्या ९ वर्षातील कार्यकाळात शेतकऱ्यांची गळचेपी झाली. तरुणांचं भ्रमनिरास करण्याचं काम झालं असून, बेरोजगारी वाढली आहे. जुनी पेन्शन योजना भाजपाच्या कोणत्याही राज्यात नाही. पण, राजस्थान, छत्तीसगड आणि हिमाचलमध्ये काँग्रेसने जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. त्यामुळे तरुणांत भाजपाविषयी राग आहे, हे समोर येत आहे. जगात सर्वात मोठा पक्ष असल्याचं गवगवा करणाऱ्या भाजपाला नाशिकमध्ये उमेदवार मिळाला नाही,” असा टोला पटोलेंनी लगावला आहे.
हेही वाचा : पार्थ पवारांनी घेतली शंभूराज देसाईंची भेट, गोपीचंद पडळकरांचा खोचक टोला; म्हणाले, “घरात आजोबांकडून…”
“नाशिकमध्ये भाजपाचा गोंधळ स्पष्ट होणार आहे. मागून वार करण्याची पद्धत महाराष्ट्रात आणली आहे. दुसऱ्यांचं घर फोडण्याचं काम भाजपा करत आहे. कोणत्या आधारावर ते घर फोडत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करत असल्याचं अनिल देशमुख प्रकरणातून स्पष्ट झालं आहे. अनिल देशमुखांवर १०० कोटींचा आरोप करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला कुठं ठेवलं आहे,” असा सवाल नाना पटोलेंनी भाजपाला विचारला आहे.