राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी २०१४ मध्ये सोडला. त्यामुळे त्या पक्षात काय चाललं आहे यावर मी भाष्य करणार नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांची महाविकास आघाडी यापुढे सत्तेवर येणार नाही असं मी खात्रीने सांगतो आहे असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांच्या टीकेलाही उदय सामंत यांनी उत्तर दिलं आहे.
दोन दिवसांपूर्वी ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका झाल्या. त्यामध्ये भाजपा क्रमांक एकवर आहे, शिवसेना क्रमांक दोनवर, राष्ट्रवादी काँग्रस तिसऱ्या क्रमांकावर, काँग्रेस चौथ्या तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पाचव्या नंबरला होता. त्यामुळे सामनाच्या अग्रलेखात काहीही लिहिलं तरीही परिणाम काय असतो हे लोकांनी दाखवून दिलं आहे. विषाणू कोण आहे हे या निकालातून स्पष्ट झालं आहे. कृषी उत्पन्न समितीत भाजपाला आणि आम्हाला मिळून ४५ टक्के जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सामनातून त्यांनी लिहित रहावं महाराष्ट्र त्यांची दखल घेत नाही असंही प्रत्युत्तर उदय सामंत यांनी संजय राऊत यांना दिलं आहे. काही वेळापूर्वीच उदय सामंत यांच्याशी टीव्ही ९ मराठीने संवाद साधला त्यावेळी उदय सामंत यांनी हे वक्तव्य केलंय.
रोज सकाळी बोलून काहीही असंबद्ध बडबड केली की त्याची ब्रेकिंग न्यूज होते. त्या सवयीतून काही लोक बोलत असतात त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही असं म्हणत उदय सामंत यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. तसंच मी आवर्जून सांगतो की पुढच्या दोन ते चार वर्षात एक सुंदर शहर म्हणून लोक रत्नागिरीत येतील अनेक चांगले प्रकल्प आम्ही या ठिकाणी राबवत आहोत असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.