लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला तब्बल ३० जागा जिंकण्यात यश मिळालं. मात्र, महाविकास आघाडी विधानसभेची निवडणूक एकत्र लढणार की नाही? याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत होते. यानंतर आज महाविकास आघाडीच्यावतीने जनतेचे आभार मानण्यासाठी आणि आगामी विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भातील भूमिका स्पष्ट करण्यासाठी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी महाविकास आघाडी विधानसभेची निवडणूक ही एकत्र लढणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं.
या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांना तुम्ही पुन्हा एनडीएबरोबर जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उद्धव ठाकरे यांनी उत्तर देताच शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण खळखळून हसले. काही दिवसांपूर्वी आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत एक विधान केलं होतं. ते म्हणाले होते, “देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर १५ दिवसांत उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबर दिसतील”, त्यांच्या या विधानानंतर चर्चांना उधाण आलं होतं. आता यावर उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला असता उद्धव ठाकरे यांनी मोजक्या शब्दांत उत्तर दिलं.
हेही वाचा : “भाजपाचा अजिंक्यपणा फोल, लोकसभा अंतिम नाही, ही लढाई…”; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, विधानसभेचं गणितही सांगितलं
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
“उद्धव ठाकरे भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीए बरोबर दिसतील असं काही दिवसांपूर्वी आमदार रवी राणा यांनी म्हटलं होतं. हा प्रश्न महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “ठीक आहे जाऊद्या”. त्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे कधी ना कधी एनडीएबरोबर येतील असं बोललं जात आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “बरं ठीक हे समजा मला जायचं, मग यांच्यामध्ये (महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये) बसून तुम्हाला सांगू का?”, असं उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलं. त्यांच्या या उत्तरावर शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण खळखळून हसले.
उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
“लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने प्रचार करताना इंडिया आघाडीला मतं दिले तर तुमची संपत्ती मुस्लिमांना देतील असा प्रचार केला. तसेच मंगळसूत्र याबाबतही नरेटिव्ह भाजपाने केलं होतं. मी नकली संतान हेही नरेटीव्ह होतं”, अशी टीका यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपावर केली.
विधानसभा एकत्र लढणार
“जेव्हा तीन पक्ष एकत्र पत्रकार परिषद घेतात, तेव्हा माध्यमांसमोर येण्याआधी आमची प्राथमिक बैठक होते. येणारी विधानसभेची निवडणूक जे जे लोक आमच्याबरोबर आहेत. तसेच महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष आणि इतर काही सामाजिक संघटना आणि छोटे पक्ष मिळून आम्ही निवडणूक लढणार आहोत”, असं आगामी विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचं गणित उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.