सोलापूर : वीजबिलांच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित झालेल्या तसेच कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित सर्व बिगरशेती वीज ग्राहकांसाठी महावितरणने आणलेल्या अभय योजनेची अंतिम मुदत येत्या ३१ मार्चपर्यंतच राहणार आहे. या योजनेसाठी महावितरणच्या बारामती परिमंडळात दोन लाख ७७ हजार ४७२ वीजग्राहक अभय योजनेसाठी पात्र आहेत. मात्र या योजनेची मुदत संपायला केवळ आठवडा बाकी असताना त्यापैकी जेमतेम दहा हजार ८१३ वीजग्राहकांनी (६.९६ टक्के) लाभ घेतल्याचे दिसून येते.

महावितरणच्या अभय योजनेनुसार वीज ग्राहक थकबाकीदारांनी केवळ मूळ थकबाकीचा भरणा केल्यास संपूर्ण शंभर टक्के व्याज आणि विलंब आकार (दंड) माफ होत आहे. मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब वीजग्राहकांना १० टक्के तर उच्चदाब वीजग्राहकांना ५ टक्के अतिरिक्त सवलत मिळते. याशिवाय सुरुवातीला मूळ थकबाकीच्या ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम व्याजमुक्त सहा महिन्यात भरण्याचीदेखील सोय आहे. तसेच लाभार्थी ग्राहकांना मागणीनुसार ज्या त्या ठिकाणी नव्याने वीज जोडणी दिली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता केवळ आठवड्याचा कालावधी शिल्लक राहिला आहे. मात्र बारामती परिमंडळात थकबाकीदार वीज ग्राहकांकडून मिळणारा प्रतिसाद अत्यल्प म्हणजे केवळ ६.९६ टक्के एवढाच असल्याचे दिसून येते.

बारामती परिमंडळात एकूण दोन लाख ७७ हजार ४७२ एवढे थकबाकीदार वीजग्राहक अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत. यात सर्वाधिक एक लाख ५५ हजार २५० वीजग्राहक एकट्या सोलापूर जिल्ह्यातील आहेत. तर बारामती मंडलात ६७ हजार २९३ आणि सातारा जिल्ह्यात ५४ हजार ८९६ वीज ग्राहकांची संख्या आहे. मात्र यापैकी सोलापूर जिल्ह्यातून अवघे ५५९६, बारामती मंडलात ३३२४ आणि सातारा जिल्ह्यात १८९३ एवढ्याच थकबाकीदार वीज ग्राहकांनी अभय योजनेचा लाभ घेऊन अनुक्रमे ४ कोटी ६८ लाख, ३ कोटी ६० लाख आणि २ कोटी ३५ लाख रुपये याप्रमाणे एकूण १० कोटी ६५ लाख रुपयांचा भरणा केला आहे. दुसरीकडे लाभार्थींपैकी ४२०४ वीजग्राहकांनी वीज पुनर्जोडणी करून घेतली आहे. तर २९७९ ग्राहकांनी नव्याने वीज जोडणी घेतली आहे. अभय योजनेची अंतिम मुदत येत्या ३१ मार्चपर्यंतच राहणार आहे. तत्पूर्वी थकबाकीदार वीजग्राहकांनी या योजनेचा लाभ घेऊन वीज थकबाकीमुक्त व्हावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.