राज्यातील विद्युत यंत्रणा सक्षम करताना महावितरणने कंत्राटदारांवर दाखवलेली मेहेरनजर हा राज्यातला दुसरा सिंचन घोटाळा असून जलसंपदा खात्यातल्या घोटाळ्याचाच कित्ता ऊर्जा खात्याने गिरवला आहे, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. राज्यात भाजपची सत्ता येताच या कोटय़वधीच्या घोटाळ्याची विशेष आयोग नेमून चौकशी करू, असे ते म्हणाले.
महावितरणमधील घोटाळ्याचे वृत्त शनिवारी ‘लोकसत्ता’त ठळकपणे प्रकाशित होताच खळबळ उडाली. विद्युत यंत्रणेच्या विस्तारीकरणाच्या कामात सुमारे १७०० कोटींचा वाढीव खर्च करण्यात आला, तर चार कंपन्यांना नियमबाह्य पद्धतीने कामे देण्यात आली. वीज नियामक आयोगाचे आदेश धाब्यावर बसवून हा गैरव्यवहार झाला. हा एका मोठय़ा घोटाळ्याचा भाग असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. जलसंपदा खात्यात गैरव्यवहार करताना जी पद्धत वापरण्यात आली, तीच पद्धत ऊर्जा खात्यातसुद्धा वापरण्यात आल्याचे या वृत्तावरून स्पष्ट झाले आहे.
आधी निविदा काढायच्या, नंतर कामे रेंगाळत ठेवून प्रकल्प खर्चात वाढ करत न्यायची आणि कंत्राटदारांवर मेहेरनजर दाखवायची. हीच कार्यपद्धती सिंचन घोटाळ्यात वापरण्यात आली होती. तोच प्रकार ऊर्जा खात्यातसुद्धा घडल्याचे आता स्पष्ट झाले आहे, असे ते म्हणाले. सत्तेवर येताच आघाडी सरकारच्या सर्वच घोटाळ्यांची चौकशी करू, असेही ते म्हणाले.
महा‘कंत्राट’ वितरण हा दुसरा सिंचन घोटाळाच
राज्यातील विद्युत यंत्रणा सक्षम करताना महावितरणने कंत्राटदारांवर दाखवलेली मेहेरनजर हा राज्यातला...
![महा‘कंत्राट’ वितरण हा दुसरा सिंचन घोटाळाच](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2014/10/devendra-fadnavis5.jpg?w=1024)
First published on: 12-10-2014 at 04:45 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahavitaran contract distribution another irrigation scam