वीज बिलात भरमसाठ वाढ करताना वीज वितरण हानी केवळ अध्र्या टक्क्याने कमी करण्याचे लक्ष्य ठेवणाऱ्या ‘महावितरण’वर चालू आर्थिक वर्षांत वीज हानी आटोक्यात ठेवणे तर दूरच पण हे नुकसान सहामाहीत एक टक्क्याने वाढलेले पाहण्याची वेळ आली आहे.
‘महावितरण’ कंपनीच्या ताज्या अहवालानुसार मे ते ऑक्टोबर २०१२ या सहामाहीच्या तुलनेत मे ते ऑक्टोबर २०१३ या सहा महिन्यांच्या काळात राज्यातील वीज वितरण हानी ०.९ टक्क्यांनी वाढली आहे. २००५-०६ मध्ये राज्य वीज मंडळाच्या पुनर्रचनेच्या वेळी वितरण हानी ३५ टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. ‘महावितरण’ अस्तित्वात आल्यानंतर २००७-०८ या वर्षांत ती २२ टक्क्यांपर्यंत आणि नंतर १२ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात यंत्रणेला यश आले खरे, पण आता ही हानी अधिक कमी करणे ‘महावितरण’ला कठीण झाले आहे. २०१२-१३ या वर्षांत अध्र्या टक्क्याने वीज हानी कमी करण्याचे लक्ष्य महावितरण कंपनीने ठेवले होते.  
फोटोमीटर रिडिंग, वीज चोरीविरुद्ध मोहीम, कृषी स्वाभिमान योजना, अशा उपक्रमांमुळे वीज हानी कमी होण्यात यश मिळाले. मात्र, अजूनही मोठय़ा प्रमाणावर वीज बिलांची थकबाकी आहे. त्यातच अनेक भागात सातत्यपूर्वक लक्ष देण्यात येऊनही वीज हानी कमी झालेली नाही.
राज्यभरात सुमारे २.१४ कोटी वीज ग्राहक आहेत. सुमारे ८ हजार फिडर्सवरून ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. सुमारे साडेतीन हजार फिडर्स हे भारनियमनमुक्त आहेत. मात्र, अजूनही दीड हजार फिडर्सवर भारनियमन सुरू आहे. शहरी भागात ४२ टक्क्यांपेक्षा, तर ग्रामीण भागात ४५ टक्क्यांहून अधिक वीज गळती असलेल्या फिडर्सवर भारनियमन केले जाते. वीज चोरीमुळे महावितरण कंपनीला मोठे नुकसान सोसावे लागते. वीज हानीसाठी मुख्यत: वीज चोरी कारणीभूत मानली जाते. बंद असलेले किंवा सदोष मीटर, जुन्या झालेल्या किंवा अतिभारित वाहिन्या, बिघाड असलेले ट्रान्सफॉर्मर्स यामुळेही वीज हानी वाढते. वीज चोरी करणाऱ्यांसोबतच प्रामाणिक ग्राहकांनाही भारनियमनाचा फटका सहन करावा लागतो. पायाभूत सुविधा मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध असतानाही अनेक भागात वितरण व्यवस्था कमकुवत आहे.
नवीन उपकेंद्र उभारणे, उपकेंद्रांची क्षमता वाढवणे, वितरण रोहित्रांची क्षमता वाढवणे, उच्च दाब आणि लघुदाब वाहिन्यांमध्ये सुधारणा करणे, अशा उपाययोजनांमधून वितरण व्यवस्था मजबूत करण्याचे प्रयत्न होत असले, तरी निधीअभावी अनेक विभागांमध्ये जुनाट यंत्रसामुग्रीवरच भार आहे. सदोष वितरण व्यवस्थेमुळेही वितरण हानी वाढण्यास हातभार लागत आहे. राज्यात सर्वाधिक २१ टक्के वितरण हानी ही अमरावती परिमंडळात असून त्याखालोखाल विजेचे नुकसान नांदेड परिमंडळात आहे. या भागात हानी २०.७ टक्के आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत अमरावती परिमंडळात १४.७ टक्के, तर नांदेड परिमंडळात १३.९ टक्के वीज हानी होती. अमरावती परिमंडळातील वितरण हानी ६.३ टक्क्यांनी, तर नांदेडातील हानी ६.८ टक्क्यांनी वाढली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परिमंडळनिहाय हानी %
अमरावती- २१.०, औरंगाबाद-     १५.८, बारामती- १२.२, भांडूप-     १३.३, जळगाव- ८.४, कल्याण-     १०.२, कोकण- १४.६, कोल्हापूर- ११.४, लातूर-     २०.२
नागपूर शहर- १२.४, नागपूर-     १०.२, नांदेड- २०.७, नाशिक-     १५.०, पुणे- ८.८, राज्य- १२.९

परिमंडळनिहाय हानी %
अमरावती- २१.०, औरंगाबाद-     १५.८, बारामती- १२.२, भांडूप-     १३.३, जळगाव- ८.४, कल्याण-     १०.२, कोकण- १४.६, कोल्हापूर- ११.४, लातूर-     २०.२
नागपूर शहर- १२.४, नागपूर-     १०.२, नांदेड- २०.७, नाशिक-     १५.०, पुणे- ८.८, राज्य- १२.९