महायुतीतील पाच नेते बुजगावण्यासारखे आहेत आणि आव मात्र ‘जित्राबा’चा आणतात. त्यांचे काही खरे राहिलेले नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेचे जहाज बुडू लागले आहे, एकेक खासदार पक्ष सोडू लागला आहे. भाजपचे गोपीनाथ मुंडे जीभ उचलली की, वाटेल ते बोलून खोटे नाटे आरोप करतात, राजू शेट्टी आणि सदा खोत हे स्वत: चुका करतात आणि आमच्या नावाने पावत्या फाडतात, अशा शेलक्या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीच्या पहिल्याच एकत्रित प्रचार सभेत महायुतीवर तोफ डागली. सहा महिन्यांपूर्वी सेनेचे ७-८ खासदार पक्ष सोडायला तयार झाले होते, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव राजळे यांच्या प्रचाराचा नारळ पवार यांच्या हस्ते रविवारी दुपारी फोडण्यात आला़  या वेळी काँग्रेसचे राधाकृष्ण विखे व बाळासाहेब थोरात हे दोन्ही मंत्री उपस्थित होते.पालकमंत्री मधुकर पिचड, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड, डॉ. सुधीर तांबे, भाऊसाहेब कांबळे, चंद्रशेखर घुले, शंकरराव घुले, अरुण जगताप, बबनराव पाचपुते आदी आमदार उपस्थित होते.