विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात लढायचे असल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष व महापौरपदाच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर नेमकी कोणती भूमिका घ्यायची, असा पेच भाजप व शिवसेनेत निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेमध्ये भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस तर महापालिकेत काँग्रेस व शिवसेना अशी येती आहे. विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ही युती तुटण्याची शक्यता अधिक आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेत जिल्हा परिषदेमध्ये येत्या २१ सप्टेंबरला निवडणूक होणार असून सत्ताधारी भाजपविरुद्ध काँग्रेसने जोडतोडीच्या राजकारणाला सुरुवात केली आहे. या दोन्ही निवडणुकांवर आगामी विधानसभा निवडणुकीचे सावट आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबतच भाजप व शिवसेना नेत्यांना पुन्हा अभद्र युती करायची की समविचारी पक्षांसोबत आघाडी करायची हा पेच निर्माण झालेला आहे. जिल्हा परिषदेत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी संघटना, मनसे, युवाशक्ती, शिवसेना व बसपा महायुतीची सत्ता आहे. विद्यमान अध्यक्ष संतोष कुमरे भाजपचे तर उपाध्यक्ष व कृषी सभापती अनुक्रमे संदीप गड्डमवार व अरुण निमजे यांच्याकडे आहे. परंतु आता गड्डमवार यांना ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार प्रा.अतुल देशकर यांच्या विरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे आहे. त्यामुळे एकीकडे जिल्हा परिषदेत भाजप सोबत संसार थाटायचा आणि विधानसभेत भाजप उमेदवाराच्या विरुद्ध निवडूक लढवायची याचा संदेश जनमानसात योग्य जाणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे आता नेमकी कोणती भूमिका घ्यायची यावर राष्ट्रवादीचे स्थानिक नेते विचारविनिमय करीत आहेत. शेतकरी संघटनेची तीच अवस्था झाली असून युतीच्या विरोधात भूमिका असताना आता सोबत कशी करायची ? हा प्रश्न संघटनेच्या नेत्यांनासुध्दा पडलेला आहे. परंतु सर्वाधिक अडचण ही राष्ट्रवादी काँग्रेसची होणार आहे. कारण जिल्हा परिषदेत काँग्रेसची सोबत केली आणि विधानसभेत आघाडी झाली व काँग्रेसच्या वाटय़ा ब्रम्हपुरी मतदारसंघ गेला तर गड्डमवार यांच्यासमोर अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. एकूण ५७ सदस्य असलेल्या जिल्हा परिषदेत काँग्रेसचे सर्वाधिक २१ सदस्य आहे. त्यापाठोपाठ भाजप १८, राष्ट्रवादी काँग्रेस ७, युवा शक्ती ५, शेतकरी संघटना २, शिवसेना २, मनसे १, बसप १ आहे. आता आकडेवारीच्या खेळात नेमकी कोण बाजी मारतो याकडे सर्वाचे लक्ष आहे. महापालिकेत काँग्रेस-शिवसेना अभद्र युती आहे. विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर युती होऊ नये असे भाजपच्या स्थानिक नेते व नगरसेवकांना वाटत असले तरी शिवसेना ही आजवर काँग्रेस सोबतच गेली आहे. परंतु विधानसभा निवडणुक बघता मतदारांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून शिवसेना जिल्हाध्यक्ष बाळू धानोरकर व रमेश देशमुख नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तर धानोरकर यांच्या आदेशाचे पालन स्थानिक शिवसैनिक करतात किंवा नाही हे सुध्दा येथे बघण्यासारखे आहे. कारण शिवसेनेचे शहर प्रमुख संदीप आवारी व जिल्हा प्रमुख धानोरकर यांच्यात पूर्वीसारखे सख्य राहिलेले नाही. त्यात आवारी उपमहापौर असून त्यांना कुठल्याही स्थितीत त्यांचे हे पद कायम ठेवायचे आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर आवारीची भूमिका महत्त्वाची आहे.
दरम्यान, एकूण ६६ नगरसेवक असलेल्या महापालिकेत काँग्रेसचे सर्वाधिक २६ नगरसेवक आहेत. त्यापाठोपाठ भाजपचे १६, शिवसेना ५, राष्ट्रवादी काँग्रेस ४ व अन्य १५ नगरसेवक आहेत. यातही काँग्रेसमध्ये तीन गट पडले आहेत. माजी खासदार नरेश पुगलिया यांचे गटातून विद्यमान महापौर संगीता अमृतकर, सभापती रामू तिवारी व गटनेते संतोष लहामगे बाहेर पडले असून स्वतंत्र गट चालवित आहेत. नगरसेवक नंदू नागरकर यांचा सहा नगरसेवकांचा वेगळा गट आहे. त्यामुळे महापौर निवडणुकीत सभापती रामू तिवारी व नंदू नागरकर नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. शिवसेना नगरसेवकांनी पुन्हा काँग्रेससोबत संसार थाटल्यास त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीवर निश्चित होईल. त्यामुळे शिवसेना भाजपसोबत जाते की काँग्रेसच्या फुटीर गटासोबत राहते हे अजून तरी स्पष्ट झालेले नाही. परंतु महापौरपदाची निवडणूक जाहीर होताच महापालिकेतील सत्ताकारणाला वेग येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा