गोपीनाथ मुंडे यांनी लोकसभेत भाजप-शिवसेनेसह ४ घटकपक्षांना जोडून केलेली महायुती हा यशाचा फॉम्र्युला ठरली. घटकपक्षांचा योग्य सन्मान करताना विधानसभेतही महायुती कायम राहील व यशही मिळेल, असा दावा आमदार पंकजा मुंडे यांनी केला. महायुतीत जागा वाटपावरून कोणताही तणाव नसून दोन दिवसांत प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
संघर्ष यात्रेनिमित्त पंकजा मुंडे यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधला. यात्रेचे प्रमुख सुरजितसिंह ठाकूर, आमदार विनायक मेटे, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे आदी उपस्थित होते. आमदार मुंडे म्हणाल्या की, संघर्ष यात्रेदरम्यान राज्याच्या विविध भागांतील प्रश्न समजून घेता आले. साडेतीन हजार किलोमीटर अंतर व ८१ मतदारसंघांत प्रवास करताना लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सामान्य जनता भ्रष्ट आघाडी सरकारला कंटाळल्याचे दिसून आले. दिवंगत मुंडे यांच्यानंतर हवालदिल झालेल्या लोकांना यातून आधार मिळाला. भाजपचे जनसमर्थन वाढण्यास यामुळे मदत झाल्याचा दावा त्यांनी केला.
पुन्हा मुंडे मिळाले – ठाकूर
चाळीस वर्षांच्या राजकीय संघर्षांत गोपीनाथ मुंडे यांनी राज्याच्या राजकारणात स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली. पंकजा मुंडे यांच्या यात्रेलाही लोकांनी डोक्यावर घेतले. मुंडेसाहेबांसारखीच पंकजा यांची बेधडक शैली, मेहनतीची तयारी, सामान्यांचे प्रश्न जाणून घेण्याची हातोटी व सभा गाजवण्याचा वकूब दिसून आल्याचा दावा ठाकूर यांनी केला.
पंकजा यांना अश्रू अनावर
दरम्यान, जागोजागी स्वागतफलक, महिला-पुरुषांची गर्दी, युवतींची दुचाकी रॅली, कार्यकर्त्यांच्या ओसंडून वाहणाऱ्या उत्साहात शेकडो वाहनांच्या ताफ्यासह पंकजा मुंडे यांच्या संघर्ष यात्रेचे आगमन झाले. परळीचे नियतीने हिरावून घेतलेले राजकीय वैभव मिळवण्यासाठी मी राज्य सांभाळते तुम्ही जिल्हा सांभाळा, अशी भावनिक साद घालत यात्रा समारोपाच्या दिशेने मार्गस्थ झाली. दिवंगत मुंडे यांच्यानंतर पहिल्यांदाच जिल्ह्य़ात जाहीर सभेत आलेल्या पंकजा यांना अश्रू अनावर झाले. उद्या (गुरुवारी) चौंडी (जिल्हा नगर) येथे पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत यात्रेचा समारोप होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा