गेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात आघाडी आणि युतीला समसमान पाच-पाच जागा मिळवणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीला चांगलीच चपराक देऊन महायुतीने दहाही जागांवर ऐतिहासिक विजय मिळवून आघाडीचा फज्जा उडवला आहे. एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या विदर्भात यावेळी मात्र भाजपने वर्चस्व मिळवून भगवा झेंडा फडकविला आहे. काँग्रेसच्या अनेक दिग्गजांना धोबीपछाड बसली आहे. साऱ्या देशाचे लक्ष असलेल्या रा.स्व. संघाच्या भूमीत भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांच्या रूपाने प्रथमच कमळ फुलले असून विदर्भात जल्लोशाचे वातावरण होते.
 विदर्भात मतमोजणी सुरू झाल्यावर एक एक निकाल जाहीर होत असताना भाजपाच्या गटात आनंद आणि उत्साहाचे, तर काँग्रेसमध्ये मात्र निरुत्साह दिसून आला. काँग्रेसचे मुख्यालय असलेले देवडिया भवन कुलूपबंद होते. विदर्भात नितीन गडकरींसह भाजप आणि शिवसेनेच्या सर्वच उमेदवारांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली. गडकरींना शह देण्यासाठी आम आदमी पक्षाने अंजली दमानिया यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. रामदास तडस (वर्धा), आनंदराव अडसुळ (अमरावती), भावना गवळी (यवतमाळ-वाशीम), हंसराज अहीर (चंद्रपूर), नाना पटोले (भंडारा-गोंदिया), कृपाल तुमाने (रामटेक), अशोक नेते (गडचिरोली), संजय धोत्रे (अकोला), प्रतापराव जाधव (बुलढाणा) या सर्व महायुतीच्या उमेदवारांनी लाखाची आघाडी घेत विजय मिळविला. यापूर्वी निवडणुकीत सलग आठ वेळा लोकसभेचे प्रतिनिधित्व करणारे विलास मुत्तेमवार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री आणि काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक, खासदार दत्ता मेघे यांचे चिरंजीव माजी आमदार सागर मेघे, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे, भारिप-बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर हे दिग्गज नेते पराभूत झाले आहेत. भंडारा-गोंदियात हमखास काँग्रेसचा विजय होईल, असे सर्व अंदाज असताना पटेल यांना फटका बसला.

Story img Loader