राज्यात सत्ता आल्यास एलबीटी रद्द, टोलमुक्त महाराष्ट्र, शेतकऱ्यांच्या वीजबिलात निम्म्याने कपात व कृषीसाठी वेगळा अर्थसंकल्प, अशा घोषणांची खैरात करत ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकले. बीड येथे झालेल्या ‘महाएल्गार’ सभेत बोलताना त्यांनी शरद पवार व अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना तुरुंगात पाठवल्याविना गप्प बसणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजप-शिवसेना-रिपाइं या महायुतीची ‘महा एल्गार’ सभा रविवारी बीड येथे पार पडली. त्या वेळी काँग्रेस व राष्ट्रवादी या सत्ताधारी पक्षातील १६ मंत्री भ्रष्टाचारी आहेत. त्यांचा निषेध करण्यासाठी १६ तोंडी रावण तयार करून त्याचे प्रतिकात्मक दहन २८ फेब्रुवारी रोजी राज्यभरात करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली. सभेआधी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत मुंडे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, ुप्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे हे उपस्थित होते. त्यानंतर समितीतील निर्णयांची माहिती पत्रकारांना देण्यात आली.
महायुतीची पुढील सभा २३ फेब्रुवारी रोजी डोंबिवलीत होणार असल्याचे मुंडे यांनी जाहीर केले.
मोदी-पवार भेटीवर ‘उद्धवास्त्र’
उद्धव ठाकरे यांनी या वेळी शरद पवार व नरेंद्र मोदी यांच्या भेटीचा उल्लेख करत पवार यांच्यावर टीका केली. पवार एका खिडकीतून युतीला डोळे मारतात. लढायची ताकद नाही, तर उसने अवसान का आणता, असा टोला उद्धव यांनी हाणला. कोणाच्याही पाठीत वार करण्याची आमची अवलाद नाही, असेही त्यांनी सुनावले. शेट्टी व आठवले यांच्याविरोधात सरकार सुडबुद्धीने गुन्हे नोंदवत असल्याबद्दल ठाकरे व मुंडे यांनी टीका केली.
काँग्रेसखेरीज शरद पवारांना अन्य मार्ग नाही -मुंडे
लोकसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल, अशी शक्यता मला वाटत नसून शरद पवार यांना आम्ही काँग्रेससोबत जाण्याखेरीज अन्य कोणताही मार्ग शिल्लक ठेवलेला नाही. पवार यांना रालोआ सोबत घेण्याची आमची तयारी नसल्याचा पुनरुच्चारही ज्येष्ठ भाजप नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केला. महायुतीत जागावाटपाचा कोणताही तिढा नसून महिन्याअखेरीस माढासह सर्व मतदारसंघाबाबत समन्वय व संवादातून तोडगा काढला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बीड येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना मुंडे यांनी राष्ट्रवादी केवळ पश्चिम महाराष्ट्रापुरता मर्यादित असल्याची खिल्ली उडवली. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या वक्तव्यावर बोलताना मुंडे म्हणाले, शिंदे हे पवार यांना पंतप्रधान करायला निघालेले काँग्रेसचे नेते आहेत. त्यांचे कोणतेही वक्तव्य मी गांभीर्याने घेत नाही. महायुतीला राज्यात चांगले वातावरण असल्याने युतीच्या नेत्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत, पण त्याला आपण घाबरणार नाही. सत्ता आल्यानंतर हे सर्व गुन्हे मागे घेतले जातील.
मला संपवण्याचे षडयंत्र – जानकर
या वेळी उपस्थित असलेले महादेव जानकर म्हणाले, माढा मतदारसंघावर राष्ट्रीय समाज पक्षाचा हक्क आहे. मी खासदार होण्यासाठीच आलो आहे. मात्र महायुतीतीलच काही नेते मला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र अंतिम निर्णय हा मुंडे यांचा राहील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.