राज्यातल्या सर्वच राजकीय पक्षांनी आगामी लोकसभा आणि महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. अजित पवार गटाच्या येण्याने राज्यातील भाजपाप्रणित महायुती मजबूत झाली आहे. तर महाविकास आघाडीकडूनही जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. अशातच राज्यात असे काही लहान-मोठे पक्ष आहेत जे ना कुठल्या आघाडीत आहेत ना युतीत. त्यापैकीच एक म्हणजे राष्ट्रीय समाज पक्ष. महादेव जानकरांचा हा पक्ष मागील निवडणुकीत एनडीएबरोबर होता. अद्याप त्यांची कोणत्याही पक्षाबरोबर युती झालेली नाही. जानकर सध्या रासपच्या जनस्वराज्य यात्रेनिमित्त राज्यभर फिरत आहेत. अशातच त्यांनी आगामी निवडणुकीत ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महादेव जानकर यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही महायुतीची साथ सोडलीय का? त्यावर जानकर म्हणाले, या राज्यात, देशात आपला पक्ष वाढला पाहिजे, यासाठी गेल्या दिड महिन्यांपासून आम्ही रासपची जनस्वराज्य यात्रा काढली आहे. युतीबद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी (महायुती) आम्हाला बोलावलं नाही आणि आम्हीसुद्धा त्यांना गृहित धरलं नाही.

महादेव जानकर म्हणाले, अलिकडेच त्यांची एनडीएची बैठक झाली. त्या बैठकीसाठी त्यांनी आम्हाला निमंत्रण पाठवलं नव्हतं. आम्ही त्याबद्दल काही बोलणार नाही. एनडीए किंवा इंडियापैकी (विरोधकांची आघाडी) कोणीच आम्हाला निमंत्रण दिलं नाही. त्यामुळे आम्ही सध्या एकटे चालत आहोत. माझा स्वभाव पहिल्यापासूनच असा आहे. आय एम नॉट अ डिमांडर, वुई आर कमांडर, भीक मागून हक्क मिळत नाहीत. सत्ता मिळवायची असेल तर स्वतःच्या हिंमतीवर आणि जबाबदारीने घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे.

हे ही वाचा >> “यांची निवडून यायची खात्री नाही अन् निघाले…”, विनायक राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शिंदे गटाचा टोला; म्हणाले…

महादेव जानकर म्हणाले, सध्या देशात भाजपा आणि काँग्रेस हे दोन मोठे पक्ष आहेत. त्यांच्याबद्दल आपण आत्ताच टिप्पणी करायची गरज नाही. महाराष्ट्रात रासपला चांगली संधी आहे. शिवसेनेत दोन गट पडले आहेत. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. त्यामुळे राज्यात रासपसाठी चांगलं वातावरण आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahdev jankar says we wont get rights by begging on alliance with bjp asc