Mahendra Thorve bodyguard Viral Video : कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या सुरक्षा रक्षाकाडून एका वाहन चालकाला भर रस्त्यात लोखंडी रॉडने मारहाण केली जात असल्याची एक चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने ही चित्रफीत एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे. “मिंधे राजवट फक्त गुंडासाठीच आहे”, असं म्हणत ठाकरे गटाने शिवेसनेच्या शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. दुसऱ्या बाजूला, ठाकरे गटाचे आरोप आमदार थोरवे यांनी फेटाळले आहेत. “मारहाण करणारा इसम माझा सुरक्षा रक्षक नाही”, असं थोरवे यांनी म्हटलं आहे. “ज्याला मारहाण झाली आहे तो माझा नातेवाईक आहे”, असं आमदार थोरवे म्हणाले.
ठाकरे गटाने एक्सवर या घटनेचा व्हिडीओ शेअर करत पोस्ट केली आहे की “महाराष्ट्रात गुंडाराज! मिंधेंच्या आमदाराच्या, महेंद्र थोरवे यांच्या ‘शिवा’ नावाच्या बॉडीगार्डने नेरळ येथे भर दिवसा, भर रस्त्यात एका व्यक्तीला मारहाण केली. त्या व्यक्तीची पत्नी व मुलं रडत होती. परंतु, कोणीही त्याच्या मदतीला जायची हिंमत केली नाही. कायद्याच्या चिंधड्या, लोकांचे हाल केले जात आहेत. ही फक्त कर्जतची अवस्था नाही, राज्यभरात गुंडगिरी वाढली आहे! कायदा-सुव्यवस्थेची वाट लागली आहे. कारण, गुंडांचा म्होरक्याच बेकायदेशीरपणे मुख्यमंत्रीपदावर बसला आहे!”
मिंधे गटाची राजवट गुंडांसाठीच; ठाकरे गटाची टीका
नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. वर्दळ असलेल्या रस्त्यावर एका इसमाने लाकडी दंडुका घेऊन एका वाहन चालकाला जबर मारहाण केली. हा इसम वाहन चालकाला मारत असताना त्या वाहनात बसलेली लहान मुलं रडत असल्याचा आवाज येतोय. या घटनेची चित्रफीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर शेअर केली आहे. शिंदे गटाची राजवट गुंडासाठीच अशी टीकाही या पोस्टमधून करण्यात आली.
हे ही वाचा >> Kirit Somaiya : पक्षाचा आदेश धुडकावल्यानंतर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “साडेपाच वर्ष…”
आमदार थोरवे काय म्हणाले?
दुसऱ्या बाजूला, ही चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर आमदार थोरवे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. थोरवे म्हणाले, या घटनेशी माझा काडीमात्र संबंध नाही. मारहाण करणारा इमस माझा आपला सुरक्षा रक्षक नाही. दोन्ही कार्यकर्ते शिवसेनेचे आहेत. उलट मारहाण झालेली व्यक्ती माझ्या नातेसंबधातील आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून घटनेद्वारे माझ्या बदनामीचा प्रयत्न होत आहे.
संजय राऊतांची फडणवीसांवर टीका
दरम्यान, यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटातील राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर बोट ठेवत राऊत म्हणाले, गृहमंत्री फडणवीस, हे दृष्य पाहून तुम्हाला लाज वाटली पाहिजे. काय अवस्था केलीय तुम्ही या महान राज्याची?