महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आणि मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जाधव यांनी जखमी अवस्थेत स्वतःचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी दावा केला आहे की, “माथाडी संघटनेसंदर्भात चर्चा करण्यासाठी मी राज ठाकरे यांच्या घरी गेलो होतो. तिथे मला अमित ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बेदम मारहाण केली.” दरम्यान, या मारहाणीनंतर जाधव यांना खारघर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महेश जाधव यांनी म्हटलं आहे की, काही माथाडी कामगारांच्या मागण्या घेऊन मी अमित ठाकरे यांना भेटण्यासाठी राजगड (मनसेचं कार्यालय) येथे गेलो होतो. तिथे अमित ठाकरे यांनी राज ठाकरे यांचा मित्र विनय अग्रवाल याच्या सांगण्यावरून मला मारहाण केली. हे ठाकरे मराठी माणसाचे कैवारी नाहीत, ते केवळ दलाल आहेत. त्यांचा पक्ष दलाल आहे. केवळ खंडणी वसूल करणारा पक्ष आहे. या फेसबूक लाईव्हनंतर ते लोक माझा जीव घेतील, मला मारून टाकतील. मला काही झाल्यास राज आणि अमित ठाकरे हे दोघेच जबाबदार असतील.

दरम्यान, या व्हायरल व्हिडीओनंतर मनसेने महेश जाधव यांच्यासह कामगार सेनेवर कारवाई केली आहे. मनसेने एक परिपत्रक जारी केलं आहे. यामध्ये म्हटलं आहे की, सर्व महाराष्ट्र सैनिकांना कळवण्यात येत आहे की, राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मराठी कामगार सेना या संघटनेची आणि संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे. मराठी कामगार सेना या संघटनेचा आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा आजपासून मनसेशी अथवा पक्षाची अंगीकृत संघटना महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे मराठी कामगार सेनेच्या कोणत्याही भूमिकेशी, मराठी कामगार सेनेच्या पदाधिकारी आणि सदस्यांशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षाचा आणि पक्षाच्या इतर अंगीकृत संघटनांचा कोणताही संबंध नसेल.

हे ही वाचा >> “अमित ठाकरेंकडून मला जीवे मारण्याचा प्रयत्न”, जखमी मनसे पदाधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल, संदीप देशपांडे म्हणाले…

महेश जाधवांच्या आरोपांवर संदीप देशपांडे म्हणाले…

दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी याप्रकरणी पक्षाची भूमिका मांडली आहे. संदीप देशपांडे यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी फोनवरून बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, महेश जाधव यांनी केलेले सर्व आरोप खोटे आहेत. या आरोपांमध्ये काही तथ्य नाही. हा प्रकार घडला तेव्हा मी तिथे नव्हतो. परंतु, मला आमच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. अमित ठाकरेंकडे महेश जाधव यांच्या अनेक तक्रारी येत होत्या. कामगारांची फसवणूक करणे, कामगारांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे त्यांना जाब विचारण्यासाठी अमित ठाकरे यांनी बोलावलं होतं. परंतु, जाधव काही कामगारांना घेऊन तिथे गेले आणि अमित ठाकरे यांना उलटसुलट उत्तरं देऊ लागले. त्यामुळे तिथे उपस्थित असलेले महाराष्ट्र सैनिक संतापले आणि त्यांनी महेश जाधव यांना मारहाण केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahesh jadhav accuses amit thackeray for beating mns dismiss trade union suspended party workers asc