प्रसिद्ध मराठी आणि हिंदी चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आज (२८ मार्च) दादरच्या (मुंबई) छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आयोजित शिवजयंतीच्या कार्यक्रमाला भेट दिली. आज देशभरात तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जात आहे. यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दादरच्या शिवाजी महाराज पार्कवर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमांना मांजरेकर यांनीदेखील हजेरी लावली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशीदेखील बातचीत केली. मांजरेकर म्हणाले, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आपण नक्की एखादा चित्रपट काढू.
महेश मांजरेकर यांना यावेळी राजकीय प्रश्न विचारण्यात आले. परंतु, ते म्हणाले, मी राजकारणासाठी नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त इथे आलो. तसेच मी माझ्या मित्रासाठी इथे आलो आहे. मांजरेकर यांना यावेळी विचारण्यात आलं की, तुम्ही अनेक वास्तवदर्शी चित्रपट काढले आहेत, त्यामुळे सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तुमचं काय मत आहे. यावर महेश मांजरेकर म्हणाले, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आपण नक्कीच एखादा चित्रपट काढूया.
महेश मांजरेकर यांनी यापूर्वी लोकसभा निवडणूक लढवली आहे. परंतु, त्या निवडणुकीत मांजरेकर यांचा पराभव झाला होता. मांजरेकर हे मनसेच्या राजकीय आणि सामाजिक व्यासपीठांवर अनेकदा उपस्थित असतात. तसेच ते बऱ्याचदा राजकीय परिस्थितीवर भाष्य करतात. शिवजयंतीच्या कार्यक्रमानंतर महेश मांजरेकर म्हणाले, शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष आणि त्यांचे नेते सध्या एकाच व्यासपीठावर दिसतायत हे चांगलं चित्र आहे.
हे ही वाचा >> डॉ. अमोल कोल्हेंनी आढळराव पाटील यांना वाकून नमस्कार करत घेतले आशीर्वाद, दोन्ही नेते समोरासमोर आले अन्…
महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘ही अनोखी गाठ’ हा चित्रपट अलीकडेच प्रदर्शित झाला. परंतु, या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली नाही. मांजरेकर यांचा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा महत्त्वकांक्षी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. तसेच त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘जुनं फर्निचर’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.