चिटफंड घोटाळाप्रकरणी उस्मानाबाद पोलिसांच्या अटकेत असलेल्या महेश मोतेवारच्या खासगी सुरक्षारक्षकाने पत्रकारांना धक्काबुक्की केली. जिल्हा शासकीय रुग्णालयातून मोतेवारला सोलापूर येथे उपचारासाठी घेऊन जात असताना गुरुवारी सकाळी हा प्रकार घडला. या प्रकरणी पत्रकार महेश पोतदार आणि संतोष जाधव यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी खासगी सुरक्षारक्षक शहानूर काझी याला अटक केली आहे. दरम्यान महेश मोतेवार याच्यावर नेमके काय उपचार केले, याची माहिती देण्यासाठी कागदपत्रांसह हजर राहण्याचे समन्स स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने जिल्हा रुग्णालयाला बजावण्यात आले आहे.
महाराष्ट्रासह ओरिसा, मध्य प्रदेश पोलिसांना विविध गुन्ह्यांत हवा असलेला मोतेवार गेल्या तीन दिवसांपासून उस्मानाबाद पोलिसांच्या कोठडीत आहे. बुधवारी रात्री पोटात दुखत असल्याचे सांगून उस्मानाबाद येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाला. रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, सकाळी अचानक त्याला पुढील उपचारासाठी सोलापूरला पाठविण्याचा निर्णय झाला. याच वेळी माध्यमांचे प्रतिनिधी याचे वार्ताकन करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात आले असता, वार्ताकन आणि चित्रीकरण करण्यास मज्जाव करीत महेश मोतेवार याचा खासगी सुरक्षारक्षक शहानूर काझी याने पत्रकार महेश पोतदार आणि संतोष जाधव यांना धक्काबुक्की केली.
मोतेवार ससून रुग्णालयात
उस्मानाबाद: मोतेवारला छातीत दुखत असल्याने अतिदक्षता विभागात गुरुवारी दाखल करण्यात आले. त्यामुळे उमरगा येथील न्यायालयात त्यास हजर करणे पोलिसांना शक्य झाले नाही. न्यायालयाने मोतेवारला पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून दर १२ तासांचा वैद्यकीय उपचार अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

Story img Loader