वीजबिल वितरण व मीटर रीिडगचे काम करणाऱ्या महिला बचत गटाचे बिल काढण्यास महावितरणच्या वरिष्ठांकडून अडवणूक होते. या शिवाय विविध बिले काढण्यासाठी लाच मागण्यासह त्रासदायक भूमिका घेतली जात असल्याच्या कारणावरून कळंब तालुक्यातील शिराढोण येथील महिला बचत गटाने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की शिराढोण येथील शहाजमानी महिला बचत गट महावितरणचे वीजबिल वितरण व मीटर रीिडगचे काम तीन वर्षांपासून करीत आहे. फोटोद्वारे मीटर रीिडगचे कामही कंपनीच्या ठरवून दिलेल्या दराप्रमाणे करीत आहे. परंतु मागील जून महिन्यापासून महावितरणच्या कळंब कार्यालयाकडून बचत गटास सहकार्य करण्याचे औदार्य दाखविण्यात येत नाही. केलेल्या कामांच्या ऑर्डर अडवून ठेवल्या जात आहेत. तत्कालीन अभियंता आंबेकर यांनी वारंवार सांगूनही ऑर्डर न देता, तोंडी आदेश देऊन काम पूर्ण करून घेतले. त्यांची बदली अंबाजोगाई येथे झाली. नवीन रुजू झालेले अभियंता वारकरी यांना या कामाची माहिती सांगितली असता, आंबेकरांची सही आणा, असे ते बचत गटाच्या महिलांना सांगतात. बचत गटातील महिलांनी अंबाजोगाई येथे जाऊन आंबेकर यांना सही करण्याची विनंती केली असता, त्यांनी ३० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप निवेदनात आहे.
लाच देण्यास असमर्थता दाखविल्याने तुमचे बिल निघणार नाही, असे सांगून आंबेकर यांनी तेथून हाकलून दिले. त्यानंतर हे काम आम्ही केल्याचे अभियंता वारकरी यांना सांगितले. तुम्ही आमची वर्कऑर्डर द्या, अशी विनंती केली असता त्यांनीही १० हजारांची लाच मागितली. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मागितलेली लाच देण्यास बचत गट असमर्थ आहे. पशांची पूर्तता न करण्यामुळेच बिले काढण्यास टाळाटाळ होत आहे. सध्या कार्यालयात असलेल्या जवळीकर यांनीही त्रास देण्याच्या भूमिकेतून १० हजारांचा दंड बचत गटास केला. महिला बचत गटास महावितरणचे अधिकारी त्रास देत असून, या प्रकरणी तोडगा निघेपर्यंत आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर यशस्विनी सामाजिक अभियानच्या जिल्हा समन्वयक अॅड. मनीषा राखुंडे-पाटील, मंजूषा खळदकर, आशा साळुंके, साक्षी माने, सुशीला साठे, सुरय्या शेख, अंजली पाटील आदींच्या सह्य़ा आहेत.

Story img Loader