लोकसभा निवडणूक जाहीर झाली. त्यामुळे आचारसंहिता बुधवारपासून लागू झाल्याने घोषणांचा पाऊस आता थांबेल असे जनतेला वाटू लागले. प्रचंड महागाई आणि अनेक प्रश्नांची भीषणता असूनही उमेदवाराच्या व्यक्तिगत चर्चेने लोकसभा निवडणुकीचे ढोल वाजू लागले आहेत. काँग्रेस व शिवसेना यांच्यातच सिंधुदुर्गात लढत होईल असे बोलले जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात कणकवली, कुडाळ व सावंतवाडी अशा तीन विधानसभा मतदारसंघातील आठ तालुक्यांचा समावेश आहे. जिल्ह्य़ात ६ लाख २३ हजार ७५१ मतदार नोंद झाले आहेत. तसे पाहता सन २००९ च्या निवडणुकीपेक्षा ३७ हजार २७० मतदारांची वाढ तर मयत, दुबार १२ हजार ९०४ मतदारांची घट झाली आहे.
जिल्ह्य़ात १८/१९ वय पूर्ण झालेले मतदार ७ हजार ९७५ तर १९ वर्षे पूर्ण झालेले ३३ हजार ९४५ म्हणजेच ४१ हजार ९२० मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रमात वाढले आहेत. मतदारांना नावनोंदणी करण्यासाठी आयोगाने आणखी संधी दिलेली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांची जास्त प्रमाणात तर जनता दल, आम आदमी पार्टी आदींची चर्चा असते.
पण काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांत लढत होणार आहे.
काँग्रेस उमेदवार खासदार डॉ. नीलेश राणे व शिवसेनेचे आमदार विनायक राऊत यांनी सिंधुदुर्गातील मतदारांच्या कौलासाठी आचारसंहितेपूर्वीच भटकंती केली. दोघांनीही आरोप-प्रत्यारोप करत आवाहनही दिले आहे.
लोकसभा निवडणूक पाश्र्वभूमीवर प्रचंड महागाईने त्रस्त असणाऱ्या सामान्य माणसाच्या प्रश्नावर कुणीतरी बोलेल अशी अपेक्षा आहे. देशस्तरावरील विषयापेक्षा जिल्ह्य़ात अनेक प्रश्नावर आंदोलने व चर्चा होते. त्यामुळे त्याच प्रश्नावर मतांचा बाजार घडणार किंवा कसे, हा प्रश्न विचारला जात आहे.
जिल्ह्य़ात चिपी विमानतळ, सी वर्ल्ड, परप्रांतीय, रेडी पोर्ट, आरोंदा पोर्ट, तिलारी प्रकल्प, वनटाईम सेटलमेंट, गौण खनिज, मायनिंग, आडाळी एमआयडीसी, वैश्यवाणी समाज व मराठा समाज आरक्षण, खड्डेमय रस्ते, अन्नसुरक्षा योजना, जीवनदायी योजना, कोकण रेल्वे, कोकण रेल्वे टर्मिनस, वनसंज्ञा, इको सेन्सिटिव्ह असे एकापेक्षा अनेक विषय लोकांना सतावत आहेत. त्यामुळे त्यांना कसे काय पटविले जाते त्यावर मतदारांचा बाजार निश्चित होणार आहे.
लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्गात काँग्रेस-शिवसेनेत मुख्य लढत
लोकसभा निवडणूक जाहीर झाली. त्यामुळे आचारसंहिता बुधवारपासून लागू झाल्याने घोषणांचा पाऊस आता थांबेल असे जनतेला वाटू लागले.
First published on: 07-03-2014 at 01:28 IST
TOPICSकाँग्रेसCongressलोकसभाLoksabhaलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionलोकसभा पोल २०२४Lok Sabha Pollsसंसदीय निवडणुकाParliament Election
+ 1 More
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Main fight between shiv sena and congress in sindhudurg parliamentary elections