महांकाली सहकारी साखर कारखाना राजारामबापू कारखान्याकडे
दिगंबर शिंदे
सांगली : पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखानदारीमध्ये प्रबळ असलेल्या इस्लामपूरच्या राजारामबापू सहकारी साखर कारखान्याने जिल्ह्यात महांकाली सहकारी साखर कारखाना २५ वर्षांसाठी चालविण्यास घेण्याचा निर्णय घेतला. कारखान्याच्या वार्षिक सभेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनीच तशी घोषणा केली आहे. जिल्ह्यातील सुमारे ४० टक्के उस गाळप करण्याची क्षमता राजारामबापू कारखान्याकडे यापुढील काळात असणार असून जिल्ह्याच्या आर्थिक नाडय़ा आता इस्लामपूरच्या हाती राहण्याची चिन्हे आहेत.
पलूस-कडेगाव वगळता अन्य सर्वच तालुक्यांतील साखर कारखानदारीची धोरणे आणि दिशा आता इस्लामपूरकरांच्या हाती एकवटली तर आश्चर्य वाटणार नाही अशी स्थिती आहे. सांगली जिल्ह्याचे गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ अर्थकारण कृष्णाकाठच्या ऊस पट्टय़ातच फिरत आले आहे. बारमाही वाहणाऱ्या कृष्णा-वारणा नदींच्या खोऱ्यात असलेल्या पाण्यामुळे आणि जलसिंचनाचे जाळे असलेल्या या भागातील ऊस शेतीने आर्थिक स्थैर्य दिले. मात्र, या पश्चिम भागातील सधनतेवर मिरज, तासगाव, विटा, जत, कवठेमहांकाळ आणि आटपाडी या दुष्काळी भागातही राजकीय सोयीतून साखर कारखानदारी सहकाराच्या माध्यमातून उभारली. यातील मिरजेचा मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना राजारामबापूच्या पाठबळावर तग धरून राहिला. अन्य साखर कारखाने आर्थिक संकटात सापडत गेले.