हिंगोली जिल्ह्यातील बुधवारी (२९ डिसेंबर) कळमनुरी ते आखाडा बाळापूर मार्गावर पार्टी मोड शिवारामध्ये ट्रक आणि खासगी बसचा भीषण अपघात झाला. यात ४ जणांचा मृत्यू झाला, तर २४ जण जखमी झाले आहेत. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मृतांमध्ये पंचफुलाबाई विठ्ठल गजभार (वय ७०, रा. बाभळी ता. कळमनुरी), विठ्ठल तुकाराम कनकापूरे (वय ६०, रा. ब्राह्मणगाव, ता. उमरखेड), त्रिवेणाबाई राजप्पा आजरसोंडकर (वय ४५), राजप्पा दगडू आजरसोडकर (वय ४८ दोघे रा. अजरसोंडा ता. औंढा) यांचा समावेश आहे.

नांदेड येथून एक खासगी बस (क्र. एम एच ३८ एफ ८४८५) प्रवासी घेऊन हिंगोलीकडे येत होती. यावेळी कळमनुरीकडून आखाडा बाळापूरकडे जाणाऱ्या कंटेनरची खासगी बससोबत समोरासमोर धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की खासगी बसच्या केबिनमध्ये बसलेले काही प्रवासी चालकाच्या समोरील काचा फुटून बाहेर फेकले गेले. या अपघातामध्ये २ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

याबाबतची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक बालाजी पुंड यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. याशिवाय परिसरातील गावकरी घटनास्थळी एकत्र आले. पोलीस व गावकऱ्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून ४ रुग्णवाहिकांद्वारे अपघातातील जखमींना उपचारासाठी कळमनुरी येथील रुग्णालयात पाठवले.

कंटेनर उलटल्यामुळे त्याखाली सापडलेले २ जणांचे मृतदेह जेसीबीद्वारे कंटेनर उचलून बाहेर काढण्यात आले. या अपघातामुळे कळमनुरी ते आखाडा बाळापूर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तातडीने वाहतूक सुरळीत केली. या अपघातातील बाबुराव ज्ञानोजीराव मोरे (रा. वारंगा फाटा), सुभाष पौळ (रा कलगाव), विठ्ठल गजभार (रा.बाभळी), नंदा काळे (रा. हिंगोली), मोहम्मद इक्बाल (रा.नांदेड ) यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवले.

Story img Loader