पुण्यातील पाटील इस्टेट झोपडपट्टीत भीषण आग भडकली आहे. आतापर्यंत १०० पेक्षा जास्त झोपडया या आगीत जळून खाक झाल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाच्या ४० गाडया आग विझण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. पण अजूनही आगीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. या आगीत दोन जण जखमी झाले आहेत. झोपडपट्टीतील क्रमांक ३ च्या गल्लीमध्ये दुपारी एकच्या सुमारास ही आग लागली. आगीचे रौद्ररुप पाहता पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरातून अग्निशमन दलाच्या गाडया मागवाव्या लागल्या. दोन दिवसांपूर्वी पाच नंबर गल्लीमध्ये आग लागली होती तेव्हा दोन घरे जळाली होती.
झोपडीतील सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची शक्यता आहे. सहा वर्षापूर्वी देखील अशीच घटना याच ठिकाणी घडली होती. पाटील इस्टेट झोपडपट्टीत जवळपास ४०० घर आहेत. संपूर्ण झोपडपट्टी रिकामी करण्यात आल्याची माहिती आहे. पुणे-मुंबई मार्गावर ही पाटील इस्टेट झोपडपट्टी आहे. सहा ते सात सिलेंडरचे स्फोट झाल्यामुळे आग आणखी भडकली.
पुण्यात झोपडपट्टीला भीषण आग, सिलेंडरच्या स्फोटामुळे आगीचा भडका
सविस्तर वृत्त >>> https://t.co/TXAFu7zI0b#Pune #Shivajinagar pic.twitter.com/3h3ufvfiTh— LoksattaLive (@LoksattaLive) November 28, 2018
धुराचे मोठ मोठे लोट आकाशाच्या दिशेने उठताना दिसत आहेत. आग अधिक पसरु नये यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. जमलेल्या गर्दीमुळे अग्निशमन दलाच्या जवानांना काम करताना अडथळे येत आहेत.
अग्निशमन दलाच्या वाहनांना झोपडपट्टीपर्यंत पोहोचण्यात अडथळे येऊ नये यासाठी वाहतूक रोखण्यात आली आहे. अरुंद गल्ल्यांमुळे अग्निशमन दलाला पोहोचण्यासाठी अडथळे येत आहेत. वाहतूक शाखा आणि स्थानिक पोलीस घटनास्थळावरील गर्दीला आवरण्याचा प्रयत्न करत आहेत.