रत्नागिरी : गोवा राज्यात मासेबंदी झाल्यामुळे कोकणासह मुंबईतील मोठे मच्छीमार आणि घाऊक व्यापारी नवीन बाजारपेठेच्या शोधात असून  केरळ किंवा कर्नाटकातील बेळगाव, हुबळीसारख्या शहरांमध्ये त्या दृष्टीने चाचपणी सुरू झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील मासळी केरळ किंवा कर्नाटकमधील हुबळीच्या बाजारपेठेत निर्यात करण्यासाठी होलसेल व्यापारी इच्छुक आहेत परंतु अंतर जास्त असल्याने त्यासाठी इन्सुलेटेड व्हॅनची गरज आहे.

जिल्ह्य़ात सुमारे पंधरा-सोळाशे ट्रॉलर्स आहेत, तर पर्ससीन अधिकृत ५० आहेत. मात्र अनधिकृतपणे सुमारे तीनशेहून जास्त पर्ससीन नौका मासेमारी करतात, असा अंदाज आहे. त्यामुळे येथे मासळी मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होते.

पारंपरिक छोटय़ा व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी दिलीप घारे म्हणाले की,  मासेबंदीमुळे मच्छीमारांची आर्थिक अडचण झाली आहे. मात्र या परिस्थितीत घाऊक व्यापारयांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. सौंदाळे, सुरमई, खाडीतील मासळी गोव्यात पाठवली जात होती, तर तारली मासा तेलासाठी प्रक्रिया कंपनीकडे आणि बांगडा, रॉकी फिश युरोपीय देशांत निर्यात होतात. तसेच केरळ आणि कर्नाटकमध्येही मासे पाठवण्याचे प्रमाण वाढू शकते.

मच्छीमार  खोबरेकर यांनी सांगितले की, शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यांनी त्यातून मार्ग करण्याचे जाहीर केले आहे. कर्नाटक व महाराष्ट्रासाठी गोवा ही मासळीची मध्यवर्ती  घाऊक बाजारपेठ आहे. पण तेथील मासेबंदीमुळे जिल्ह्य़ातील मासळीच्या घाऊक व्यापाऱ्यांनी पर्यायी मार्ग शोधण्याचा प्रयत्नही चालवला आहे.

दरम्यान गोवा सरकाच्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून सिंधुदुर्गच्या  मासळी व्यापाऱ्यांनी गोवा राज्यातील मासळी वाहनांची जिल्ह्य़ात नाकेबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. गोवा राज्यातून वेंगुल्रे, निवती, शिरोडा बंदरात येणाऱ्र्या इन्सुलेटेड व्हॅनना जिल्ह्य़ातील मच्छीमारांनी प्रवेशबंदी करून गोव्याच्या मासळीच्या व्यापाराची नाकेबंदी करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे  मुंबईवरून गोव्यात जाणारी मासळी बुधवारी  झाराप तिठा येथे रोखली गेली. तसेच अनेक इन्सुलेटेड व्हॅन गोव्यात परत पाठवण्यात आल्याचे मच्छीमारांनी सांगितले. या प्रश्नासंदर्भात देवगड व वेंगुल्रे तालुक्यातील मासे वाहतूक करणाऱ्या वाहनचालक-मालक वाहनधारकांचीही बैठक पार पडली. या बठकीत त्यांनी गोवा सरकारच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात गोव्यातून सिंधुदुर्गात मच्छीवाहतुकीसाठी येणाऱ्या वाहनांना अटकाव करण्याचा इशारा दिला आहे.

याबाबतचे वेंगुल्रे तालुक्यातील संदीप पेडणेकर, अंकुश वेंगुल्रेकर, गोल्डन फर्नाडीस, नयन पेडणेकर यांच्यासह देवगड तालुक्यातील किरण कांबळी, नितीन देशपांडे, सौरभ गोगटे इत्यादी मच्छीवाहतूकदार चालक-मालक उपस्थित होते.