तालुक्यातील काताळवेढे येथे मंगळवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सुमारे तीनशे घरांची पडझड झाली. डाळिंबाच्या बागा, मिरची, टोमॅटो, कोथिंबीर तसेच कांद्याचेही अतोनात नुकसान झाले. कुक्कुटपालनाच्या शेडला वादळाचा तडखा बसून शेकडो कोंबडय़ा मृत्युमुखी पडल्या.
मंगळवारी दुपारी पावणेपाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. वाऱ्याचा वेग इतका होता की पाऊस सुरू होताच घरांवरील पत्रे, कौले उडण्यास प्रारंभ झाला. शेतकऱ्यांच्या घरांवरील छपरेही उडून गेल्याने अनेक कुटुंबे बेघर झाली. डोक्यावर दगड, विटा पडल्याने काही नागरिक किरकोळ जखमी झाले.
काताळवेढय़ासह डोंगरवाडीमध्येही वादळी वाऱ्यासह पावसाने थैमान घातले. निम्म्या गावात मोठा पाऊस झाला. येथे नव्यानेच बांधलेला बंधाराही या पहिल्याच पावसात भरला. घरांवरील छपरे उडाल्याने अनेक नागरिक बेघर झाले असून त्यांनी इतरत्र आसरा घेतला आहे. डाळिंबाच्या बागांचे मोठे नुकसान झाले असून, अलीकडेच झालेल्या गारपिटीनंतर या बागा सावरत असताना पुन्हा वादळाचा तडाखा बसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. मिरची, टोमॅटो, कोथिंबीर तसेच कांद्याच्या पिकांचेही नुकसान झाले. कांद्याच्या आरणींवरील आच्छादन उडाल्याने त्यातील कांदाही भिजला.
या भागात नुकसान झाल्याची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार डॉ. विनोद भांबरे, गटविकास अधिकारी किरण महाजन यांनी काताळवेढय़ास भेट देऊन कृषी, महसूल तसेच पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. शिवसेनेचे तालुकाप्रमुख नीलेश लंके, विद्यार्थी सेनेचे तालुकाप्रमुख अ‍ॅड. राहुल झावरे हेही अधिकाऱ्यांसमवेत होते. कांद्याच्या आरणीचे पंचानामे न करण्याची भूमिका कृषी खात्याच्या कर्मचाऱ्यांनी घेतल्याने नीलेश लंके व राहुल झावरे यांच्याशी त्यांची चांगलीच बाचाबाची झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा